Punha Duniyadari : 'तेरी मेरी यारी...’ म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘दुनियादारी' (Duniyadari) हा चित्रपट समस्त महाराष्ट्राच्या पसंतीस उतरला होता. ज्येष्ठ साहित्यिक सुहास शिरवाळकर यांच्या कादंबरीवर आधारीत व दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित 'दुनियादारी' या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक रेकॉर्ड मोडले. 10 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक-निर्माते संजय जाधव यांनी ‘फ्रेंडशिप डे’चं निमित्त साधत ‘पुन्हा दुनियादारी’ (Punha Duniyadari) या चित्रपटाची घोषणा केली आहे.
‘दुनियादारी’ या चित्रपटातील श्रेयस-दिग्याची दोस्ती, बोल्ड शिरीन आणि चॉकलेट बॉय श्रेयसची लव्ह स्टोरी, जितेंद्र जोशीने वठवलेला 'साई' नावाचा व्हिलन असेल किंवा श्रेयसवर प्रेम करणारी भोळी मिनू असेल, आजही ही पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या सुपरहिट चित्रपटाला रिलीज होऊन आता तब्बल 10 वर्ष उलटून गेली आहेत. दिग्दर्शक संजय जाधव 'पुन्हा दुनियादारी' हा नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
चित्रपटाचं पोस्टर रिलीज!
'फ्रेंडशिप डे'च्या निमित्ताने माऊली प्रोडक्शन निर्मित 'पुन्हा दुनियादारी' या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा पोस्टर लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी दिग्दर्शक संजय जाधव, डी. पी. यू. बी स्कूलचे डायरेक्टर डॉ. अमोल गावंडे, निर्मात्या डॉ. मनिषा किशोर टोलमारे, निर्माते डॉ. अंकुश हरीकिशन अग्रवाल, अभिनेत्री आयली घिया, माऊली प्रॉडकशनची संपूर्ण टीम आणि आदी मान्यवर उपस्थित होते. या चित्रपटाचे लवकरच चित्रीकरण सुरू होणार असून, पुन्हा तीच ‘दुनियादारी’ दिग्दर्शक संजय जाधव यांच्या वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
मैत्री आणि प्रेमाची नवी संकल्पना मांडणारा चित्रपट!
या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले की, 'दुनियादारी' या चित्रपटाला प्रेक्षकांनी जे प्रेम दिलं, तसंच 'पुन्हा दुनियादारी' लासुद्धा देतील. हा चित्रपट आणि यातील पात्र नव्या अंदाजात प्रेक्षकांना पडद्यावर दिसणार असून, मैत्री आणि प्रेमाची नवी संकल्पना मांडणारा हा चित्रपट असणार आहे. चित्रपटातील कलाकारांबद्द्ल जाणून घेण्यासाठी आणखी थोडे दिवस प्रेक्षकांना वाट बघावी लागणार आहे.
चित्रपट निर्माते डॉ. मनिषा किशोर टोलमारे म्हणाल्या की, माऊली प्रोडक्शन हे देशाला एक 'रिवोल्युशनरी स्क्रीन'ची ओळख करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच, पुन्हा दुनियादारी हा सुद्धा त्यापैकीच एक प्रयत्न असून, मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक पुन्हा वळतील आणि प्रेक्षकांना मनोरंजन तसेच, चित्रपट क्षेत्राला नवी उर्जा देणारा हा दर्जेदार चित्रपट असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या