Sangram Salvi : अभिनेता संग्राम साळवी (Sangram Salvi) आणि खुशबू तावडे (Khushbu Tawade) हे मराठी सिनेसृष्टीतलं सगळ्यात लाडकं जोडपं आहे. खुशबू आणि संग्रामने 2018 मध्ये लग्न केलं. त्यानंतर आजही त्यांचा सुखी संसार सुरु आहे. एका मालिकेच्या शुटींगदरम्यान त्यांचं जुळलं. मालिकेच्या सेटवर त्यांची भेट झाली आणि तिथेच त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. पण त्यांच्या अफेअर दरम्यानचा एक खूप सुंदर किस्सा संग्रामने नुकताच सांगितला.
संग्रामने नुकतीच कॉकटेल स्टुडिओला मुलाखत दिली. त्यामध्ये लग्नाआधी खुशबूच्या एका मालिकेदरम्यानचा किस्सा त्याने सांगितला आहे. त्या सीननंतर त्याने खुशबूला सांगितलेली गोष्ट ही आजच्या पिढीतील प्रत्येक जोडप्याच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरु शकते. खुशबूच्या सीनवर संग्रामने दिलेल्या प्रतिक्रियेविषयी त्याने खुलासा केला.
संग्रामने काय म्हटलं?
संग्रामने हा किस्सा सांगताना म्हटलं की, जेव्हा आमचं अफेअर नुकतच सुरु झालं तेव्हाची ही गोष्ट आहे. तिची एक सिरियल सुरु होती, त्याचा पहिला एपिसोड मला पाहायला मिळाला नाही. पण दुसऱ्या दिवशी आई म्हणाली की, खुशबूची सिरअल आहे, तू काल बघितली नाहीस. तोपर्यंत आमच्या घरात माहिती होतं आणि घरातून सगळं ओके होतं. त्या सिरिअलचा एपिसोड मी पाहयला बसलो. त्यामध्ये एक सीन आहे की, खुशबू येते आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला मिठी मारते. तेव्हा मी उठलो आणि निघून गेलो. त्यानंतर तिचा मला फोन आणि आम्ही संध्याकाळी भेटलो. त्यावेळी तिने मला विचारलं की, तू पाहिलीस का सिरिअल. मी तिला म्हटलं हो मी पाहिलं, त्यावर ती म्हणाली की, मग तुला कसं वाटलं तू काय मला सांगितलं नाही. तेव्हा मी तिला सांगितलं, की काय आहे ना खुशबू ती जी मिठी मारलीस ना, तिथे मी उठून निघून गेलो. ते एकून तिला जरा दडपण आलं. ती मला म्हणाली अरे सॉरी तो सीनच तसा होता.
पुढे संग्रामने सांगितलं की, तेव्हा मी तिला म्हटलं की, बरोबर आहे,तो तुझा होणारा नवरा दाखवला आहे ना. तुझं लग्न ठरलंय त्याच्याबरोबर म्हणजे तुमचं नात खूप छान असणार.मग इतकी घाणेरडी मिठी कोण मारतं. म्हणजे असं वाकून वैगरे ऑकवर्ड पोजिशनमध्ये, नीट मिठी मारायची, होणारा नवरा आहे तो. त्यावर तिला जरा वेगळं वाटलं, तिने वेगळा विचार केला होता पण मी वेगळंच काहीतरी म्हटलं. पुढे मी तिला म्हटलं की, तू त्या पात्रात होती, मग ती मिठी छान मरायची ना, ते स्क्रिनवर छानच दिसलं पाहिजे. ते वाईट दिसल्यावर कुणी येऊन सांगणार नाही, ते तुला मीच येऊन सांगणार. अशा वेळी थोडं अवघल्यासारखं होतं, तो स्पर्श वैगरे, पण तू त्या पात्रात होतीस ना. तेव्हा मी तिला सांगितलं हे पुन्हा करु नकोस.