Mahesh Kothare : लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde), महेश कोठारे (Mahesh Kothare) आणि अशोक सराफ (Ashok Saraf) हे महाराष्ट्राचं सगळ्यात लाडकं त्रिकुट. या तिघांचा प्रत्येक सिनेमा आजही मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. पण आज या त्रिकुटातील एक अवलिया आज या जगात नाही. पण तरीही लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव माहित नाही, असा मराठी प्रेक्षक महाराष्ट्रात तरी क्वचितच. आजही अनेकजण लक्ष्मीकांत बेर्डे यांना रंगभूमीवर असो किंवा मोठ्या पडद्यावर, तितकंच मिस करतात. याच मराठी प्रेक्षकांसाठी महेश कोठारे यांनी मागे एक घोषणा केली होती. एआयच्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे यांना पुन्हा प्रेक्षकांमध्ये आणणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
पण यासाठी प्रिया बेर्डे यांच्या परवानगीची आवश्यकता असल्याचंही महेश कोठारे यांनी स्पष्ट केलं आहे. महेश कोठारे यांनी ही घोषणा केली तेव्हाच झपाटलेला 3 चीही घोषणा झाली होती. झपाटलेला सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे आणि आजही त्या भूमिकेवर प्रेक्षक प्रेम करतात. त्यानंतर आलेल्या झपाटलेला 2 मध्ये महेश कोठारे यांनी 3D चा प्रयोग केला होता. त्यामुळे आता झपाटलेला 3 मध्ये एआयचा प्रयोग होणार आणि लक्ष्मीकांत बेर्डे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार का याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
तरच लक्ष्याला रिक्रिएट करणार - महेश कोठारे
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये एआयच्या प्रश्नावर बोलताना महेश कोठारे यांनी म्हटलं की, लक्ष्याला रिक्रिएट करुन आणावं अशी माझी खूप इच्छा आहे. पण त्यासाठी मला काही परवानग्या घेणं जास्त गरजेचं आहे.कारण मध्यंतरी मला प्रिया बेर्डेचा फोन आला की तुम्ही अशी अशी घोषणा केलीत, असं असं म्हणताय. तुम्ही मला न विचारता असं एआयच्या माध्यमातून त्याला आणणार का? त्यावर मी तिला म्हटलं की, असं कसं तुला न विचारता मी आणीन,तुला विचारुनच आम्ही आणणार आहोत. तुझी परवानगी असेल तरच आपण पुढे जाऊ. पण तिने परवानगी द्यावी अशी माझी इच्छा आहे.
झपाटलेला - 3 मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे दिसणार?
'झपाटलेला 3' चित्रपटाच्या निर्मितीच्या हालचालीला वेग आला आहे. हॉरर-कॉमेडी जॉनर असलेल्या चित्रपटाची सगळ्यांना प्रतिक्षा आहे. या तिसऱ्या भागात लक्ष्मीकांत बेर्डेदेखील दिसणार आहेत. आर्टिफिशयल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे पडद्यावर दिसणार आहेत. निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी एका कार्यक्रमात याबाबतचे सूतोवाच केले असल्याचे वृत्त समोर आले होते. या चित्रपटाच्या निर्मितीचे काम सुरू झाले असून लक्ष्मीकांत बेर्डेचे पात्र पुन्हा पडद्यावर आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले.