Sangharsh Yodha Movie Surbhi Hande :  'जय मल्हार' या मालिकेतून लोकप्रिय झालेली  अभिनेत्री सुरभी हांडे (Surbhi Hande) आता रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. मराठा आरक्षणासाठी निर्णायक आंदोलन छेडणारे  मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या 'संघर्षयोद्धा' चित्रपटात सुरभी महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सुरभी  हांडे ऑनस्क्रिन मनोज जरांगे यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. 


मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी आता 'संघर्षयोद्धा' या चित्रपटातून मांडली जाणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. एका लढवय्या कार्यकर्त्याच्या लढवय्या पत्नीची ही भूमिका आहे. हा चित्रपट 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. 


मनोज जरांगे पाटील यांच्या आजवरच्या वाटचालीत त्यांच्या पत्नीची जबाबदारी महत्त्वाची ठरली. मनोज जरांगे पाटील समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढत असताना घरच्या आघाडीवर त्यांची पत्नी लढत होती. त्यामुळेच जरांगे पाटील हे वादळ महाराष्ट्रभर फिरू शकलं. त्यामुळे आरक्षणासाठी लढणारा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीचा पत्नीचा संघर्षही तितकाच मोठा आहे. त्यामुळे एका लढवय्या कार्यकर्त्याच्या पत्नीच्या संघर्षाची कहाणी या चित्रपटात दाखवली जाणार आहे. ही आव्हानात्मक भूमिका अभिनेत्री सुरभी हांडे साकारत आहे. 


'जय मल्हार', 'गाथा नवनाथांची', 'लक्ष्मी सदैव मंगलम' अशा टीव्ही मालिका, 'अगं बाई अरेच्चा 2' अशा चित्रपटांतून सुरभीने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. तिच्या आजवरच्या भूमिकांमध्ये संघर्षयोद्धा चित्रपटातली भूमिका सर्वांत वेगळी ठरणार आहे. जरांगे पाटील पती-पत्नीचं नातं या चित्रपटातून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे.


शिवाजी दोलताडे यांनी  या चित्रपटाच्या  दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे. तर, सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. 


चित्रपटात कोणत्या कलाकारांच्या भूमिका?


या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे,  माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.