Samantha Ruth Prabhu father Joseph Prabhu passes away : अभिनेत्री समंथा रुथ प्रभूवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. समंथाचे वडिल जोसेफ प्रभू यांचे शुक्रवारी (दि. 29  नोव्हेंबर) रोजी निधन झाले. अभिनेत्रीने ही दुःखद बातमी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केली आहे. एक भावनिक नोट शेअर करत समंथाने लिहिले , "जोपर्यंत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत... बाबा" याशिवाय तिने तुटलेल्या हृदयाचा इमोजी देखील शेअर केला आहे. या हृदयद्रावक बातमीने टॉलिवूडमधील सेलिब्रिटींकडूनही शोक व्यक्त करण्यात येतोय. वडिलांच्या निधनानंतर समंथा रुथ आणि तिच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


समंथा रुथच्या वडिलांचे निधन


समंथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांच्या निधनापूर्वी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत समंथा रुथ प्रभूने तिचे वडील जोसेफ यांच्याशी असलेल्या तिच्या नात्याबाबत भाष्य केलं होतं. आपल्या वडिलांचे कौतुक करताना समंथा म्हणाली होती की, "तो काळ आठवला जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला खूप छान पद्धतीने वाढवले". समंथा लहानपणापासूनच वडिलांच्या जवळ होती. तिच्या वडिलांनी अभिनेत्रीच्या संगोपन आणि जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सिने क्षेत्रातील कामं सांभाळत समांथ आपल्या कुटुंबियांसाठी वेळ देत होती.  


सॅम आणि चैतन्यच्या घटस्फोटामुळे वडील नाराज होते


ऑक्टोबर 2021 मध्ये, समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाला होता.  दरम्यान, यानंतर एक वर्षाने, समंथाचे वडील जोसेफ प्रभू यांनी फेसबुकवर लग्नाचे जुने फोटो पोस्ट केले. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले की, "हा घटस्फोट स्वीकारण्यासाठी मला बराच वेळ लागू शकतो". समंथा आणि चैतन्य यांचे गोव्यात 6 आणि 7 ऑक्टोबर 2017 रोजी लग्न झाले होते. नंतर 2021 मध्ये या समंथा आणि चैतन्यचा घटस्फोट झाला होता. आता नागा चैतन्य 'मेड इन हेवन' अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत पुन्हा लग्न करण्यास तयार आहे.


सामंथाचा OTT धमाका


समंथाच्या सध्याच्या घडीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सामंथा अलीकडेच अमेझॉन प्राइम व्हिडिओ मालिका 'सिटाडेल: हनी बनी' मध्ये वरुण धवन सोबत दिसली होती. ही मालिका दोन आठवड्यांपासून ओटीटीवर ट्रेंड करत आहे. अभिनेत्रीने नुकतीच तिच्या वेब सीरिजच्या सक्सेस पार्टीला हजेरी लावली होती. मात्र, आता वडिलांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.