मुंबई : बॉलिवूडला सलीम - जावेद ही जोडी नवी नाही. सलीम खान आणि जावेद अख्तर या जोडीने बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट दिले. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो, दीवार, जंजिर, अग्निपथ अशा कित्येक सिनेमांचा. या दोघांच्या लेखणीतून आलेल्या कथानकांनी बॉलिवूडला एंग्री यंग मॅन दिला. अमिताभ बच्चन यांना या इमेजमधून मोठी लोकप्रियताा मिळाली. आता इतक्या वर्षानंतर सलीम-जावेद याच जोडीवर डॉक्युमेंटरी बनणार आहे. 


सलीम - जावेद यांचा लेखक म्हणून झालेला उगम.. त्यानंतर त्यांनी दिलेले हिट्स.. स्क्रिप्टिंग करताना त्यात आलेले अनेक मुद्दे अशा गोष्टींना स्पर्श करत ही जोडी कशी पुढे आली ते यात दिसणार आहे. सगळ्यात महत्वाची बाब अशी की या डॉक्युमेंटरीसाठी सलीम-जावेद यांची मुलं पुढे आली आहेत. सलीम यांचा मुलगा अर्थातच सलमान खान आणि जावेद यांची मुलं फरहान आणि झोया हे तिघे मिळून ही डॉक्युमेंटरी निर्माण करणार आहेत. याचं दिग्दर्शन करणार आहे नम्रता राव. सलमान खान फिल्म्स, एक्सेल व्हिजन आणि बेबी टायगर अशा तिघांच्या तीन कंपन्या मिळून ही डॉक्युमेंटरी तयार करणार आहेत. 


गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या डॉक्युमेंटरीचं काम चालू आहे. दिग्दर्शिका झोया अख्तर यातल्या कंटेंटवर काम करते आहे. सलमान खानला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा, सलमान या कामामध्ये निर्माता म्हणून आला आहे. सलमान खान, फरहान अख्तर आणि झोया अख्तर अशी तीन मोठी नावं यात आल्यामुळे या डॉक्युमेंटरीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सलीम -जावेद ही बॉलिवूडमधली पहिली स्टार लेखक जोडी म्हणून गणली जाते. 1970 ते 1990 या काळात त्यांनी जवळपास 24 सिनेमांचं लेखन केल आहे. यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो शोले, डॉन, क्रांती, सीता और गीता, काला पत्थर, शक्ती अशा सिनेमांचा. उत्तम संहिता आणि पकड घेतील असे संवाद हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य.