मुंबई : मुंबईकरांसाठी एक अत्यंत सकारात्मक बातमी असून मुंबईतून आता कोरोनाची दुसरी लाट काढता पाय घेत आहे. मुंबईत पालिकेने सुरू केलेले जम्बो कोविड सेंटर आता ओस पडू लागले आहेत. जंबो कोविड सेंटरमधील 10 टक्के बेडवर रुग्ण असून 90 टक्के बेड रिक्त आहेत. मात्र तरीही तीस-या लाटेची संभाव्यता लक्षात घेता महापालिकेनं जम्बो कोविड सेंटर मधील सज्जता कायम ठेवली आहे. 
 
गोरेगाव नेस्को सेंटर - एकूण बेड्स 2221 आहेत. त्यापैकी सध्या केवळ 190 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 


वरळी ‘एनएससीआय’ डोम जम्बो कोविड सेंटर- एकूण 550 बेड्स आहेत. त्यामध्ये सध्या 79 रुग्णांवर उपचार सुरु आहेत  


अंधेरी सेव्हन हिल्स रुणालय -  एकूण 1750 बेड्स , त्यापैकी 850 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


दहिसर, बीकेसी, मुलुंड हे तीन महत्वाचे जम्बो कोविड सेंटर रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आले आहेत. तर भायखळ्याचे रिचर्डसन क्रुडास सेंटरमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू आहे.


 मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच झपाट्याने रुग्णसंख्या वाढू लागली. त्यामुळे पालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर अशा प्रमुख रुग्णालयांत सुरू केलेल्या विशेष कोविड सेंटरमधील बेड अपुरे पडू लागल्याने आयसीयू, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर असणारे सहा जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आले. मात्र या ठिकाणचे बेड आता मोठ्या संख्येने रिक्त राहू लागले आहेत.तरीही  संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी सुद्धा महापालिका प्रशासनाची तयारी सुरु आहे


तीस-या लाटेसाठीची तयारी काय?


संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी 5500 बेडचे नियोजन आहे. चार नवे जम्बो कोविड सेंटरचे नियोजन केले आहे. यामध्ये मालाड, रेसकोर्स महालक्ष्मी, कांजूरमार्ग आणि भायखळा या ठिकाणी हे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याचे नियोजन आहे. याठिकाणी 70 ऑक्सिजन बेड तर 10 टक्के आयसीयू बेडची सुरू करण्यात येतील  


 तिसर्‍या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचा इशारा देण्यात आल्यामुळे नव्या जम्बो कोविड सेंटरमध्ये पेडियाट्रिक वॉर्ड असेल. ज्याठिकाणी गरजेनुसार पालकांनाही थांबण्याची सुविधा असेल.


मुंबईत कोरोनाच्या दुस-या लाटेची स्थिती आटोक्यात येत असेल आणि पुरेसे बेडही रिक्त असतील  तर मुंबईला लेव्हल 2 च्या शिथीलता लावण्यात काय अडचण असा सवाल भाजपनं केलाय. मुंबई अद्याप दुसऱ्या लेव्हल मध्ये का नाही या प्रश्नावर   वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेतला पाहिजे परंतु करण्याची भीती दाखवून मुंबईतला व्यवसाय आणि उद्योग धंदे ठप्प करू नयेत. कोरोनाच्या नावाखाली बिल्डरांना दिलासा देऊ नये असं भाजपच्या आशिष शेलारांनी म्हणटलंय. 


कोरोनाची दुसरी लाट अटोक्यात येण्याचे संकेत मिळत असले तरी पहिल्या लाटेनंतरचा अनुभव गाठीशी आहेच. त्यामुळे शिथीलता मिळाली तरी  गाफील न राहता सतर्क , सजग राहणं गरजेचंच आहे.