Salman Khan on Aamir Khan : ‘सिकंदर’ चित्रपटात झळकल्यानंतर सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला असून, लवकरच त्याचा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच दरम्यान, सलमान खान नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नवीन सिझनच्या ओपनिंग एपिसोडमध्ये सहभागी झाला. नुकतेच शोचा प्रोमो रिलीज झाला असून त्यात सलमान, कपिल शर्मा आणि टीमसोबत धमाल मस्ती करताना दिसत आहे. शोमध्ये येताच सलमानने आपल्या खास शैलीत मजा सुरू केली आणि सगळ्यांना हसवून लोटपोट केलं.

Continues below advertisement


"तुझ्या आयुष्यात 'गौरी' आहे का?" कपिलचा सवाल, सलमानचं उत्तर


शोदरम्यान होस्ट कपिल शर्माने सलमानला विचारलं, “तुझ्या आयुष्यात कुठली 'गौरी' आहे का?” यावर सलमानने स्वतःवर उत्तर न देता थेट आमिर खानकडे विषय वळवला. त्याने आपल्या मिश्कील अंदाजात म्हटलं, "आमिर म्हणजे काहीतरी वेगळाच माणूस आहे. तो एकदम परफेक्शनिस्ट आहे. जोपर्यंत लग्न परफेक्ट होत नाही, तोपर्यंत लग्न करत राहील. मला वाटतं यावेळी त्याचं लग्न परफेक्ट होईल." हे ऐकताच सेटवर जोरदार हशा उसळला.




"लोक तुला लग्नाबद्दल का टोचतात?" शोच्या जज अर्चना पूरन सिंहने सलमानला विचारलं, “लोक तुला पुन्हा पुन्हा लग्नासाठी का चिडवतात?” यावर सलमान हसत म्हणाला, "माझ्या लग्नाने तुम्हाला काय फायदा? तुम्हाला का वाटतं की मी लग्न करावं? माझं लग्न झालं तर तुम्ही खुश व्हाल आणि मी बर्बाद होईल." त्याने हसत हसत घटस्फोटानंतर मिळणाऱ्या एलिमनी (उपजीविकेचा खर्च) बाबतही टोलाही मारला. सलमान खान आपलं लग्न टाळण्यावर नेहमीच मिश्कील भाष्य करतो, तरीही त्याचे चाहते त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.


आमिर खानची प्रेमकहाणी आणि वैयक्तिक आयुष्य


आमिर खानने 1986 साली रीना दत्ताशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र 2002 मध्ये दोघं विभक्त झाले. या लग्नातून त्यांना दोन मुले आहेत – जुनैद आणि आयरा.
यानंतर 2005 मध्ये आमिरने दिग्दर्शिका आणि निर्माती किरण राव हिच्याशी लग्न केलं. मात्र 2021 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्यांचा एक मुलगा आहे – आजाद राव खान.... आता आमिर खान गौरी स्प्रॅट हिला डेट करत असून मार्च 2024 मध्ये त्याच्या 60 व्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने गौरीची अधिकृतपणे माध्यमांसमोर ओळख करून दिली होती.


दोघांचेही वर्क फ्रंटवरील अपडेट्स


सलमान खानची शेवटची फिल्म ‘सिकंदर’ होती. आता तो आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीत आहे, ज्याबद्दल त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
तर दुसरीकडे, आमिर खानचा नवीन सिनेमा ‘सितारे जमीन पर’ नुकताच 21 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाने दोन दिवसांत 32 कोटींचा गल्ला जमवला आहे. तसेच, तो लवकरच साउथ सुपरस्टार रजनीकांतच्या आगामी ‘कुली’ या चित्रपटात एक कॅमिओ (लघुभूमिका) करताना दिसू शकतो.


 


 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


'मन्नत'च्या नुतनीकरणावेळी नियमांचं उल्लंघनाचा आरोप, पण भाजपच्या बड्या नेत्याचा शाहरुख खानला सपोर्ट


'आता ती पळून गेली...', सलमानचं सोहेल खानच्या लग्नाबाबत भाष्य, स्वत:च्याच वहिनीला केलं ट्रोल