मुंबई : 'सैराट' चित्रपटातील आर्ची-परशाची जोडी फक्त महाराष्ट्रानेच नाही, तर अवघ्या देशाने डोक्यावर घेतली. ही भूमिका साकारणारे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार असल्याची माहिती आहे.
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं बॉलिवूड पदार्पण असलेल्या 'झुंड' चित्रपटात दोघं दिसणार आहेत.
2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सैराट' चित्रपटाने रसिकांना अक्षरशः वेड लावलं होतं. रिंकू आणि आकाश यांचे असंख्य चाहते निर्माण झाले. मात्र गेल्या अडीच वर्षांत दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी मिळाली नाही. आता, खुद्द नागराज मंजुळेच पुन्हा दोघांना एकत्र आणणार आहेत.
यावेळी रिंकू आणि आकाश 'जोडपं' म्हणून एकत्र दिसणार नसल्याचं म्हटलं जातं. झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन हे झोपडपट्टीतील तरुणांना फूटबॉल प्रशिक्षण देणाऱ्या विजय बारसे यांची भूमिका साकारत आहेत. रिंकू आणि आकाश या संस्थेतील फूटबॉलपटूंच्या भूमिकेत आहेत.
आकाश आणि रिंकू यांनी नागपुरात आठवडाभर शूटिंग केल्याची माहिती आहे. यावेळी चित्रिकरण स्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बिग बींसोबत काम करण्याची संधी मिळत असल्यामुळे रिंकू आणि आकाश अत्यंत उत्साहात असल्याचंही सांगितलं जातं. तसंच या सिनेमातून दोघांना बॉलिवूडची दारंही खुली होणार आहेत.
सैराटनंतर रिंकू राजगुरुची भूमिका असलेला 'कागर' हा दुसरा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर आकाश ठोसरने महेश मांजरेकरांच्या 'फ्रेण्डशिप अनलिमिटेड' सिनेमात झळकला होता. तर नेटफ्लिक्सवरील 'लस्ट स्टोरीज' या वेबसीरिजमध्ये राधिका आपटेसोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली होती.
नागराज मंजुळेंच्या 'झुंड'मध्ये रिंकू-आकाश!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jan 2019 07:52 AM (IST)
'सैराट' चित्रपटातील आर्ची-परशाची बहुचर्चित जोडी अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. नागराज मंजुळे यांचं बॉलिवूड पदार्पण असलेल्या 'झुंड' चित्रपटात दोघं काम करणार आहेत
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -