Saif Ali Khan Attacked Updates Marathi News: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये (Saif Ali Khan Attacked) मुंबई पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्ला प्रकरणामध्ये एका संशयिताची ओळख पटली आहे. या संशयिताचा मुंबई पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी, या संशयिताने पूर्व उपनगरामध्ये अशाच चोरीचा प्रयत्न केला होता. लोकांनी त्याला पकडले होते, पण त्याला मानसिक रुग्ण समजून पोलिसांच्या स्वाधीन केले नव्हते. सध्या, पोलिस या संशयिताला अटक करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, अशी माहिती समोर येत आहे. तसेच जेव्हा लोक या संशयिताला पकडतात, तेव्हा तो स्वतःला डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगतो. कंपनीचे अपॉइंटमेंट लेटरही दाखवतो, अशीही माहिती समोर आली आहे.
मुंबई पोलिसांना महाराष्ट्रातल्या एका मोठ्या व्यक्तीने केली मदत- (Saif Ali Khan Attacked Updates Marathi News)
संशयिताला ज्यावेळी लोकांनी चोरी करताना पकडले होते, त्यावेळी पोलीस स्थानकामध्ये याबाबत तक्रार दिली होती का?, याची माहितीही घेण्यात येत आहे. तसेच या संशयित व्यक्तीला पकडण्यामध्ये मुंबई पोलिसांना महाराष्ट्रातल्या एका मोठ्या व्यक्तीने मदत केली आहे. मदत करणाऱ्या व्यक्तीचे नाव सध्या जाहीर करु शकत नाही. दरम्यान, सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेला हा हल्लेखोर आणि ओळख पटलेला हा संशयित या दोघांचेही चेहरे जवळपास सारखे दिसतायत. त्यामुळे सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला करणारा हा तोच असावा, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी अजून त्याला ताब्यात घेतलेले नसून याबाबत पोलीस तपास करत आहेत.
मुंबई पोलिसांची तब्बल 35 पथके आरोपीच्या शोधात-
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान वर हल्ला होऊन दोन दिवस उलटले आहे. मात्र यातील हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मुंबई पोलिसांची तब्बल 35 पथके आरोपीचा मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेत आहे.काल रात्रीपासून वांद्रे पोलिस ठाण्यात अश्या दहा ते बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले जे या विभागात विनाकारण भटकत होते.तसेच काही सराईत गुन्हेगारांना ही पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यांना सिसिटीव्ही फुटेज दाखवून आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात होता.