Sai Tamhankar on Abp Majha Mahakatta : बोल्ड बिनधास्त आणि ब्युटीफूल अशी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर (Sai Tamhankar ). मराठी अभिनेत्रींना इतर इंडस्ट्रीमध्ये असलेल्या मर्यादा या सईने मोडित काढत एक प्रयोगशील अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. सांगली ते मुंबई असा सई ताम्हणकरचा सही प्रवास हा तिने नुकताच माझा महाकट्टावर उलगडला आहे. तसेच आयुष्यात कधी आपण निर्माता वैगेर व्हावं का या प्रश्नाचं उत्तरही सईने कट्टावर दिलं. 


सई ही मुळची सांगलीची असल्यामुळे तिने तिच्या सांगलीच्या काही शब्दांची देखील गंमत यावेळी सांगितली. सांगलीच्या मुलीला मुंबईविषयीच्या भावना देखील तिने यावेळी व्यक्त केल्या. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून सई घराघरांत पोहचली. त्याविषयी देखील तिने कट्ट्यावर भाष्य केलं आहे. मुंबई ही एक मायानगरी आहे. इथे एकटं राहणं, स्वत:च्या जीवावर राहणं असं करताना तुम्ही कधीकधी खूप थकून जाता. त्यासाठी तुमचं डोकं शांत राहणं खूप गरजेचं आहे, असंही सईने म्हटलं आहे.  


'होय मी विचाराने बोल्ड आहे'


सईने तिच्या प्रवासाविषयी बोलताना म्हटलं की, अभिनयात यायचं हे माझं कधीच ठरवलं नव्हतं. मला चांगली माणसं भेटत गेली, चांगल्या संधी मिळत गेल्या. मी सांगलीवरुन थेट मुंबईत आले. पहिल्यांदा मी जेव्हा मुंबईत आले तेव्हा या गोजिरवाण्या घरात मालिकेसाठी आले. सुरुवातीला काहीच माहित नव्हतं. म्हणजे मी सेटवर यायचे तेव्हा लोकं माझ्याबद्दल काय बोलायचे हे नंतर मला कळत गेल. हळूहळू सगळ्या गोष्टी कळत गेल्या, समजत गेल्या. आपण आयुष्यात खूप गोष्टी करतो, त्या सगळ्याच आपल्याला आवडतात असं नाही. बोल्ड वैगरे ही विशेषण मी लावून घेतली नाहीत, ती मला दिली आहे. होय मी बोल्ड आहे, पण मी विचाराने बोल्ड आहे. कोणाचाही पाठिंबा नसताना खूप मोठी स्वप्न बघणं म्हणजे बोल्ड असणं आणि होय या विचाराने मी बोल्ड आहे. 


सांगलीच्या शब्दांची सईने सांगितली गंमत


तू अभिनेत्री आहेस, तुला अशा अनेक व्यक्तिरेखा ग्रामीण भागातील भेटत असतील, त्याविषयी काय सांगशील, त्यावर सईने तिच्या सांगलीच्या भाषेच्या गंमती सांगितल्या. तिने म्हटलं की, तुम्हाला डांब म्हणजे काय माहित आहे का? डांब म्हणजे खांब, मोळा, डांब हे सगळे आमच्या सांगलीकडचे शब्द होते. म्हणजे माझी आई आजही म्हणजे मी तिथे उभारली होते. हे काही शब्द आहेत, जे फक्त आमच्या सांगलीचे आहेत. त्यामुळे हे शब्द कधी कधी ऐकू आले तर खूप बरं वाटतं. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर हे देखील सांगलीचे असल्याने ती जुगलबंदी देखील कट्टावर पाहायला मिळाली. 



'88 वर्षांची होईपर्यंत काम करायचं आहे'


तिच्या प्रवासाविषयी बोलताना सईने म्हटलं की, माझा संघर्ष हा खूप आतला होता. कारण मी जेव्हा या शहरात आले तेव्हा काहीच माहित नव्हतं. माझ्या मावशी आणि मामाने सांगितलं की, आम्ही आहोत, पण या शहरात तुझं तुलाच करावं लागले. घरापासून लांब राहणं हे मला माहितीच नव्हतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी माझ्या माझ्या शिकले. म्हणून  मला असं कायम वाटतं, की कितीही मला यश आलं तरी मी कायमच जमीनीवर ठेवलं. आपला समाज खूप मजेशीर आहे. एखादी स्त्री जेव्हा एकटी छान राहत असेल, तेव्हा त्यांना प्रश्न पडतात की, हे एवढं चांगलं कसं राहू शकतात. मला जेव्हा सांगलीहून मुंबईला जायचं ठरवलं, तेव्हाही तिने मला अडवलं नाही. कारण जेव्हा आईबाबा तुमच्यावर 100 टक्के विश्वास टाकतात, तेव्हा तुम्ही कोणतीही चुकीची गोष्ट करताना 10 वेळा विचार करतो.मला खूप काम करायची सवय आहे.  मला 88 वर्षांची होईपर्यंत काम करायचं आहे. म्हणजे तुम्हाला उद्या 60 व्या वर्षी असं वाटेल की आता हिला खूप चांगलं मिळालं, तरी माझी काहीच हरकत नाही. 


नागराज मंजुळेसोबत काम करण्याची इच्छा होती...


कोणत्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची इच्छा होती? या प्रश्नाचं उत्तर देताना सईने म्हटलं की, मला नागराज मंजुळेसोबत काम करायचं होतं, जे मी आता करतेय. ही यादी खूप मोठी आहे, ते सगळं होणार असा मला ठाम विश्वास आहे. तिच्या प्रवासाविषयी बोलताना सईने म्हटलं की, 'आमचं क्षेत्र हे खूप अनप्रेडिक्टेबल आहे. 4 महिने तुमच्याकडे खूप काम आहे, पण चार महिने असे असतात की काहीच नसतं. या गोजिरवाण्या घरातनंतर माझ्याबाबतील असंच झालं. मला असं वाटलं की, आता झालं आपलं आता काहीच होणार नाही. तेव्हा मी एमबीएला अॅडमिशन देखील घेतलं. पण त्याचं काहीच झालं.' 


हास्यजत्रेमुळे मी घरांघरात पोहचले


हास्यजत्रेविषयी बोलताना सईने म्हटलं की, महाराष्ट्राची हास्यजत्रा ही स्ट्रेसबस्टर कार्यक्रम आहे.  मला इथे बोलायला काहीच हरकत नाही की, माझं करिअर एकीकडे आणि हास्यजत्रा एकीकडे. मी हास्यजत्रेमुळे घराघरांत पोहचले. हास्यजत्रेमुळे माझ्यातली व्यक्ती घरांघरात पोहचली, जे माझ्यासाठी फार गरजेचं होतं. 



 


ही बातमी वाचा : 


Sanju Rathod : सई ताम्हणकरचा 'गुलाबी साडी'वाल्या संजू राठोडला माझा महाकट्टावर प्रश्न, संजू म्हणाला, नेक्स्ट टाईम कळेलच, धमाल घेऊन येतो!