Sagar Deshmukh : अभिनेता सागर देशमुखने (Sagar Deshmukh) 'भाई' चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकलीत. पु.लं देशपांडे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात सागरने पु.लं देशपांडे यांचीच भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे सागर आता कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुख कळले' (Sukh Kalale) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण याच चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सागरच्या आयुष्यात एक कठीण प्रसंग आला होत्या. त्या कठीण काळाविषयी सागरने भाष्य केलं आहे. 


सागर देशमुखने वायझेड, मिडियम स्पायसी, गर्लफ्रेंड, हंटर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. पण भाई या चित्रपटाचं शुटींग सुरु असताना सागरला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी कलासृष्टीतल्या अनेक मित्र-मैत्रीणींनी त्याला कशाप्रकारे मदत केली याबाबत देखील सागरने भाष्य केलं आहे. तसेच त्याला त्यावेळी मदत केलेल्या कलाकार मित्रांची नावं देखील त्याने यावेळी सांगितली. 


सागरने सांगितला 'तो' कठीण प्रसंग


सागरने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला. यावेळी सागरला तुझ्या आयुष्यात सुख कळले हा प्रसंग कधी आला होता, याविषयी विचारण्यात आलं. त्यावर बोलताना सागरनं म्हटलं की, मी भाई सिनेमाचं शुटींग करत होतो. जवळपास 90 टक्के शूट तेव्हा पूर्ण झालं होतं. पण त्याचवेळी मला हृदयविकाराचा झटका आला होता. माझी अँजिओप्लास्टी झाली. दोन ते तीन दिवस मी अतिशय गंभीर होतो. तेव्हा माझी बायको प्राजक्ता, माझ्या आजूबाजूची लोकं मोहित टाकळकर, आशिष मेहता, सारंग साठे, नेहा जोशी, ओंकार कुलकर्णी, पर्ण पेठे, मृण्मयी गोडबोले अशी मी शंभर नावं घेऊ शकतो. ही सगळी लोकं माझ्या आजूबाजूला अशी तटबंदी करुन उभी होती."


आयुष्यात माणसं असणं जास्त महत्त्वाचं - सागर देशमुख


पुढे बोलताना सागरने म्हटलं की, त्यावेळी मला जो अनुभव आला, जे प्रेम मिळाली त्यामुळे मी त्यातून बाहेर पडू शकलो. तेव्हा मला कळालं की आयुष्यात पैसा, अडका या गोष्टींच्या सुखापेक्षा माणसं आयुष्यात असणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यावेळी मला माझ सुख कळलं.  या लोकांमुळे मला अक्षरश: नवीन जन्म मिळाला. म्हणूनच आज मी ही मालिका करु शकतोय, माझ्यातली कला ही आणखी चांगल्या पद्धतीने जोपासू शकतोय. माणूस, आर्टिस्ट म्हणून माझी आणखी प्रगती होत आहे."


ही बातमी वाचा : 


Kriti Sanon : 'बॉलीवूडमध्ये ना एकोपा, ना कुणी करतं सपोर्ट'; क्रिती सेननने व्यक्त केली मनातली खदखद