Rupa Dutta : बंगाली अभिनेत्री रूपा दत्ता (Rupa Dutta) हिला 12 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळाव्यात पाकीटमारी प्रकरणी अटक करण्यात आली होती. रूपा दत्ता हिने चोरी केलेल्या पाकिटातून बिधाननगर पोलिसांनी 75000 रुपये जप्त केले. आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळाव्यामध्ये तैनात असलेल्या पोलिसांनी एका महिलेला डस्टबिनमध्ये बॅग फेकताना पाहिले. पोलिसांनी संशयावरून महिलेची चौकशी केली असता, ती नीट उत्तर देत नव्हती. यानंतर महिलेला बिधाननगर उत्तर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे चौकशी केली असता, ती बंगाली अभिनेत्री रूपा दत्ता असल्याचे समजले.


अभिनेत्री असणाऱ्या रूपा दत्ताने बंगालीसह अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. पोलीस चौकशीत तिने आपली चोरी कबुल केली आहे. मात्र, ही एकमेव चोरी नसून, या आधीच्याही चोरींची कबुली तिने यावेळी दिली.


अभिनेत्रीला चोरी करण्याचा आजार?


मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने कबूल केले आहे की, तिने यापूर्वीही अनेकदा अशा चोऱ्या केल्या आहेत. चोरीच्या उद्देशाने अनेकवेळा गजबजलेल्या भागात जाऊन पर्स चोरल्याचे तिने पोलिसांना सांगितले. कोलकाता पुस्तक मेळाव्यात येण्यामागेही तिचा हाच हेतू होता. मात्र, या चौकशी दरम्यान कदाचित रूपा क्लेप्टोमॅनियाची रुग्ण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा एक प्रकारचा मानसिक आजार असून, या आजाराने ग्रस्त व्यक्तीला सतत चोरी करण्याची इच्छा होते.


रूपाने पोलिसांसमोर चोरीची कबुली दिली आहे. त्याचबरोबर चोरीच्या पैशांचा हिशेब ठेवण्यासाठी तिच्याकडे डायरी असल्याचेही तिने कबूल केले आहे. चोरी झालेल्या सर्व पैशांचा हिशेब ती या डायरीत लिहून ठेवते.


अनुराग कश्यपवर केले होते आरोप!


काही वर्षांपूर्वी रुपा दत्ताने हिंदी चित्रपट निर्माता अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. मात्र,या दाव्याच्या समर्थनार्थ तिने कोणताही पुरावा किंवा तक्रार सादर केली नाही. त्यावेळीही तिने केवळ चर्चेत येण्यासाठी खोटे आरोप केल्याचे बोलले जात होते.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha