बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुरगोड शाखेतील साडे चार कोटी रुपये रोख आणि दीड कोटी रुपयांचे दागिने लुटलेल्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून या प्रकरणी तिघांना गजाआड केले आहे. या दरोड्यात बँकेतील क्लर्कच मुख्य सूत्रधार असल्याचे उघडकीस आले आहे. सौंदत्ती तालुक्यातील बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुरगोड शाखेवर दरोडा घालण्यात आल्याची घटना रविवारी (6 मार्च) उघडकीस आली होती.


आठ दिवसांपूर्वी पडलेल्या दरोड्याचा तपास लावणे हे पोलिसांना आव्हान होते, कारण दरोडेखोरांनी पाठीमागे कोणतेच धागेदोरे ठेवले नव्हते. शिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डरही चोरीला गेल्याचे बँकेचे व्यवस्थापक प्रमोद यालीगर यांनी तक्रारीत म्हटले होते. परंतु पोलिसांनी केवळ आठ दिवसात या दरोड्याची उकल केली आहे. जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी मुरगोड येथे पत्रकार परिषद घेऊन दरोडा प्रकरणाचा तपास बेळगाव जिल्हा पोलिसांनी लावल्याची माहिती दिली. दरोडा घालून मिळालेली रक्कम आणि सोन्याचे दागिने दरोडेखोरांनी ऊसाच्या शेतात लपवून ठेवले होते.


Belgaum Crime : बेळगावात बँकेवर दरोडा, साडे चार कोटी रोख आणि सोन्याचे दागिने लुटले


धक्कादायक बाब म्हणजे दरोडा पडलेल्या बँकेतील क्लर्कच दरोड्यात सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे. बसवराज हुनशिकट्टी (वय 30 वर्षे), संतोष कंबार (वय 31 वर्षे) आणि गिरीश बेल वाल (वय 26 वर्षे) अशी दरोडा प्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापैकी बसवराज हुनशिकट्टी हा बँकेतील क्लर्क आहे. पोलिसांनी चार कोटी 21 लाख रुपये रोख रक्कम आणि दीड कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचे दागिने देखील त्यांच्याकडून हस्तगत केले आहेत. दरोडा घालण्यासाठी वापरण्यात आलेली कार आणि एक मोटार सायकल देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.


दरोडा कसा उघड झाला?
शनिवारी (5 मार्च) बँकेचे कामकाज संपल्यावर कर्मचारी बँक बंद करुन नेहमीप्रमाणे गेले. रविवारी (6 मार्च) सकाळी साफसफाई करणारा कर्मचारी बँकेत आला असता त्याला बँकेचा दरवाजा तोडण्यात आल्याचे समजले. लगेच त्याने ही बाब बँक कर्मचाऱ्यांना कळवली. बँकेचे कर्मचारी दाखल झाल्यावर त्यांना चोरट्यांनी डल्ला मारल्याचे समजले. लगेच पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी तिथे दाखल होऊन पाहणी केली असता बँकेतील लॉकर उघडून त्यातील सुमारे साडेचार कोटींची रोख रक्कम आणि दीड कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लुटण्यात आल्याचे समजले. चोरट्यांनी आपला कार्यभाग साधल्यावर पुन्हा लॉकरचा दरवाजा बंद केला होता.