मुंबई : सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टनं चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. अनेकदा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर ब्लॉगच्या माध्यमातून विचार मांडणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी यावेळी मात्र थेट निवृत्तीचे संकेत दिले आहेत.


कायमच मोठ्या उत्साहात आपल्या कार्यक्षेत्रात योगदान देणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन यांनी मी आता थकलोय... असं लिहित चाहत्यांना विचार करायला भाग पाडलं. त्यांची ही पोस्ट वाचल्यानंतर आता खरंच अभिनयातील हा महानायक प्रेक्षकांपासून आणि सक्रिय कलाविश्वापासून दुरावा पत्करणार का, असेच प्रश्न उभे राहिले.


तूर्तास चित्रपटांबाबत बच्चन यांचा काय निर्णय असेल हे अद्यापही अस्पष्ट आहे. पण, 'केबीसी' अर्थात 'कौन बनेगा करोडपती' या रिअॅलिटी शोमधून मात्र ते येत्या काळात काढता पाय घेणार असल्याचं त्यांची ही पोस्ट सांगून जात आहे.






बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये नेमकं काय लिहिलं आहे?


मी आता थकलो आहे. निवृत्त झालो आहे..... तुम्हा सर्वांचीच मी क्षमा मागतो..., असं त्यांनी या ब्लॉगमध्ये लिहिलं. ज्यानंतर केबीसीच्या सेटवरील चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवसाला अनुसरून त्यांनी हा ब्लॉग लिहिल्याचं स्पष्ट होत आहे. शिवाय कामाप्रती असणारी समर्पकताही त्यांनी इथं न विसरता अधोरेखित केली. काम काम असतं आणि ते तितक्याच आत्मियतेनं केलं गेलं पाहिजे असा कानमंत्रही त्यांनी दिला.


बच्चन यांची ही पोस्ट पाहता ते केबीसीच्या पुढच्या पर्वात दिसणार नाहीत, असंच जवळपास स्पष्ट होत आहे. अखेरच्या भागात सारंकाही सुरळीत होतं, गोष्टींमध्ये सुसुत्रता होती. एकच इच्छा आहे, की हे सारंकाही कधीच थांबलं नाही पाहिजे. आशा करतो की, हे सारं पुन्हा घडताना दिसू शकेल, अशा अतिशय भावनिक शब्दांत त्यांनी हा ब्लॉग लिहिला. कोरोनाच्या संसर्गावर मात केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. अतिशय दमदार पुनरागमन करत या अभिनेत्यानं पुन्हा सर्वांना अवाक् केलं.


दरम्यान, येत्या काळात 'चेहरे', 'ब्रह्मास्त्र', 'बटरफ्लाय', 'झुंड' या चित्रपटांतून ते झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. आगामी चित्रपटांची ही यादी पाहता किमान सध्यातरी ते रुपेरी पडद्यापासून दूर जाणार नाहीत हे खरं. पण, येत्या काळात याबाबत ते नेमके कोणत्या निर्णयावर पोहोचतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.