मुंबई : राजधानी मुंबईतील (Mumbai) पवई येथे 17 शाळकरी मुलांना ओलीस ठेऊन सरकारविरुद्ध आपलं मत व्यक्ती करणाऱ्या रोहित आर्य याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्याची घटना घडली. आरोपी रोहितच्या ताब्यात असलेली मुले सोडविण्यासाठी पोलिसांनी (Police) गोळीबार केला, त्यात रोहित आर्यच्या छातीवर गोळी लागली, त्यातच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, या घटनेने महाराष्ट्रात, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता मॉडेल अभिनेत्री रुचिता जाधव-माने हिनेही महत्वाची माहिती दिली आहे.
रोहित आर्या यांचा फोटो जेव्हा मी टिव्हीवर पाहिला तेव्हा स्तब्ध होते. मला त्यांनी 23 तारखेला संपर्क केला होता. मी 28 तारखेला त्यांना भेटायला जाणार होती. त्याने चित्रपटाची जी स्क्रिप्ट मला सांगितली, तीच घटना त्याने प्रत्यक्षात केली. सुदैवाने मी सासऱ्याच्या आजारपणामुळे जाऊ शकले नाही. पण, ही घटना पाहून खूप भिती वाटली, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री रुचिता जाधव माने यांनी दिली.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या पवई येथील RA स्टुडिओत काही शाळकरी मुले गेल्या 4-5 दिवसांपासून प्रशिक्षणसाठी येत होती. मात्र, ऑडिशनच्या नावाखाली येथील स्टुडिओत किडनॅपरने शाळकरी मुलांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. या घटनेनं मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. ऑडिशनसाठी आलेल्या मुलांना दुपारी 2 वाजताच्या सुमारास जेवणासाठी सोडण्यात आल्यानंतर रोहित आर्य या व्यक्तीने मुलांना एका खोलीत कोंडून ओलीस ठेवले होते. पोलीस चकमकीत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर झाला असून आरोपीने पोलिसांवर गोळी झाडल्यानंतर पोलिसांनीही जशास तसं प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी, आरोपीच्या छातीत गोळी लागली होती. त्यामुळे, रोहित आर्यला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनं मुंबईसह राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पवई पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी किडनॅपर रोहित आर्यवर गोळीबार केला होता.
रुचिताचा जाहिरात मॉडेलमधून सिनेसृष्टीत प्रवेश
मॉडेलनंतर एक्ट्रेस बनलेल्या अभिनेत्री रूचिता जाधवचा दोन दशकांचा प्रवास आहे; मात्र उत्तम अभिनेत्री म्हणून दाद आणि ओळख मिळवण्यासाठी अनेक वर्षं संघर्ष करावा लागला. रूचिता जाधव ही पुण्याची आहे. व्यवसायिकांच्या कुटुंबात जन्मलेल्या रूचिताला नेहमीच काही आव्हानात्मक काम करण्याची इच्छा असे, ज्यात तिची आई कल्पना जाधव यांनी पाठिंबा दर्शविला. रूचिताने आपल्या रूपेरी जगतातील कामाची सुरूवात जाहीरातींपासून केली. एका होजिअरीच्या ब्रँडसाठी रूचिताला मॉडेल म्हणून पहिली संधी मिळाली. त्यानंतर रूचिताने खूप जाहीराती केल्या. यातूनच तिला अभिनयाची गोडी लागली. ‘अरे बाबा पुरे’ या चित्रपटातून रूचिताने 2011 मध्ये अभिनयात पदार्पण केलं. त्यानंतर ‘माणूस एक माती’, ‘वात्सल्य’, ‘चिंतामणी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकली.
हेही वाचा
आठ महिन्यानंतरची कर्जमाफी शेतकऱ्यांना कशी फायद्याची? बच्चू कडू यांनी उदाहरणासह सांगितलं