Riteish Deshmukh on Ajit Pawar on Bigg Boss Marathi 6: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला आणि अँपूर्ण महाराष्ट्र हादरला. अजित दादांचं अकाली निघून जाणं अजूनही सगळ्यांना चुटपुट लावून गेलं. दादांच्या आवाजातील जरब, कार्यकर्त्यांवर असलेली माया त्यांची प्रशासकीय जाण याची सगळेच जण आठवण काढताना दिसतायत. राजकीय नेत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वच जण हळहळ व्यक्त करत आहेत. दरम्यान लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा होस्ट रितेश देशमुख बिग बॉसच्या मंचावर दादांच्या अकाली निघून जाण्याने व्याकुळ झालेला दिसला. त्याने भाऊच्या धक्क्यावर अजित दादांची आठवण काढत त्यांना श्रद्धांजली वाहिलीय.

Continues below advertisement

काय म्हणाला रितेश?

"नमस्कार, 28 जानेवारीचा सूर्य सकाळ घेऊन येण्याऐवजी काळरात्र घेऊन आला. त्या बातमीने जो धक्का दिला, त्यातून मीच काय अख्खा महाराष्ट्र देखील सावरला नाही. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार याचं अपघाती निधन झालं... ही घटना माझ्यासारख्या अनेक महाराष्ट्र प्रेमींना वेदना देणारी आहे. कारण, ते फक्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नव्हते तर आपले लाडके दादा होते. आपण सगळे त्यांना प्रेमाने आदराने अजित दादा म्हणायचो. पण, खरंतर हा बाप माणूस होता... "

"आज हा कार्यक्रम सुरू करण्याआधी मला दादांना काही सांगायचं आहे. प्रिय दादा... आज इथे उभं राहून तुमच्याबद्दल बोलावं लागेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. खरंतर तुमच्या शैलीने, नजरेच्या धाकाने समोरच्याला नि:शब्द करण्याची ताकद तुमच्यात होती. तुमच्या शब्दात होती पण, तुमच्या जाण्याने आज महाराष्ट्र नि:शब्द झाला आहे. दादा तुमचं व्यक्तिमत्त्व म्हणजे शिस्त, माया आणि सामाजिक जाण यांचं त्रिवेणी संगम आहे. तुमचं रागावणं सुद्धा समोरच्याला कौतुकाची थाप वाटायची. अनेक वर्षे रखडलेली कामे तुमच्या एका आदेशावर मार्गी लागायची. म्हणूनच तुम्ही सामान्य माणसाच्या आयुष्यातील कामाचा माणूस होतात. तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या आयुष्याचं तुम्ही सोनं केलंत. तुमचा दिलखुलास अंदाज, मिश्किल स्वभाव... प्रत्येकाला आठवत राहिल."

Continues below advertisement

"आपल्याच कार्यकर्त्याला 'लव्ह यू' म्हणताना.... "अरे, मला काय लव्ह यू म्हणतोस, बायकोला म्हण. म्हणजे पहिले कुटुंबाकडे बघ, मग गावाकडे लक्ष दे", हे सांगणारा माणूस आता राहिला नाही. दादा... तुमची जागा कुणीच घेऊ शकणार नाही हे खरंय. कारण, तुमच्यासारखी राजकारणाची जाण आणि माणुसकीचं भान असलेला नेता आता शोधून सापडणार नाही. खरंतर महाराष्ट्राचं दुर्दैव असं आपल्यासारखी महाराष्ट्रासाठी झटणारी अनेक बापमाणसं वेळेआधीच सगळ्यांना पोरकं करुन गेली. माननीय विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब, आर.आर पाटील साहेब,प्रमोद महजन आणि आता तुम्ही... तुम्ही सगळ्यांनीच एकच धर्म पाळला.तो म्हणजे महाराष्ट्र धर्म... म्हणूनच आज महाराष्ट्रातील प्रत्येकाचे डोळे पाणावलेत. दादा तुम्ही कालही प्रेरणा होता, आजही प्रेरणा आहात आणि उद्याही असाल. आणि हीच प्रेरणा घेऊन मी कामाला लागतो."