Ram Charan: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता राम चरण पुन्हा एकदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी उपासना कोनिडेला हिने जुळ्या बाळांना जन्म दिला असून तिला एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे. ही आनंदाची बातमी राम चरणचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेता चिरंजीवी यांनी अधिकृतपणे जाहीर केली आहे.
राम चरणच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. उपासना आणि दोन्ही बाळं पूर्णपणे निरोगी असल्याची माहिती देण्यात आली आहे. या गोड बातमीमुळे चाहतेही प्रचंड आनंद व्यक्त करत आहेत.
साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांची पोस्ट
चिरंजीवीने X वर पोस्ट करत लिहिलं की, “आनंद आणि कृतज्ञतेने ही बातमी शेअर करत आहे. राम चरण आणि उपासनाने जुळ्या बाळांचे स्वागत केले आहे .एक मुलगा आणि एक मुलगी. आई आणि दोन्ही बाळं ठणठणीत आहेत. आजोबा म्हणून हा माझ्यासाठी मोठा आशीर्वाद आहे. सर्वांच्या प्रेम, प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी मनापासून आभार.”
राम चरण-उपासना यांचा विवाह
राम चरणचा विवाह 2012 मध्ये उपासनासोबत झाला होता. त्यांचा साखरपुडा डिसेंबर 2011 मध्ये झाला होता. उपासना ही अपोलो हॉस्पिटल्सचे संस्थापक प्रताप सी. रेड्डी यांची नात असून ती अपोलो चॅरिटीची व्हाइस चेअरपर्सन आहे. या जोडप्याने जून 2023 मध्ये पहिल्या अपत्याचं स्वागत केलं होतं. त्यावेळी त्यांना मुलगी झाली होती, जिने नाव क्लिन कारा ठेवण्यात आलं.
कामाच्या आघाडीवर बोलायचं झाल्यास, राम चरणला शेवटचं ‘गेम चेंजर’ या चित्रपटात पाहायला मिळालं होतं. मात्र, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नव्हतं. 2023 मध्ये त्याने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात कॅमिओ केला होता. सध्या तो स्पोर्ट्स ड्रामा ‘Peddi’ या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त असून, या चित्रपटात जान्हवी कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
