मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे अतिशय चांगल्या प्रकारे करत आहेत. त्याबद्दल अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. आता अभिनेता रितेश देशमुखनं देखील ट्वीट करुन मुख्यमंत्र्याचं कौतुक केलं आहे.


रितेश देशमुखनं ट्वीट करत म्हटलं आहे की, सध्या आपण सगळे एका वेगळ्याच संकटाचा सामना करत आहोत. आपण सगळे केवळ कोरोना व्हायरसचा सामना करतोय असं नाही तर त्याचसोबत लोकांमध्ये भीती, निराशा, अनिश्चितता देखील आहे. मात्र या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्याशी नेहमी संवाद साधत आहेत. ते आपल्या मनातील शंकांचं निरसन करत आहेत. तसंच आपल्यातील भीती देखील दूर करत आहेत. यासाठी त्यांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे असं रितेश देशमुख यानं म्हटलं आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचं संकट आल्यापासून सातत्याने फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत आहेत. वेळोवेळी ते नागरिकांना न घाबरता या संकटाचा सामना करण्यासाठी घरात बसून नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत आहेत. काल, रविवारी देखील त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. राज्यात सर्व धर्मियांनी देशकर्तव्य आणि माणुसकीच्या भावनेला प्राधान्य दिले असून सगळे सण घरीच साधेपणाने  साजरे केले आहेत, याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देतो असे  सांगताना  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना रमझानच्या काळात रस्त्यावर, मशिदीत एकत्र प्रार्थना  (नमाज) न करता ती घरातल्या घरात करण्याचे आवाहन केले होते.

आजच्या परिस्थितीत संयम हीच आपली शक्ती आहे तर आपल्या स्वास्थ्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकून काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी,सफाई कामगार पोलीस हेच आपले देव आहेत, त्यांचा आदर ठेवणे हीच  आपल्यासाठी देवभक्ती असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले होते.