ऋषी कपूर हे ट्विटरवर खूप सक्रिय होते. त्यांच्या ट्वीटची नेहमी चर्चा व्हायची. अनेकदा त्यांनी केलेल्या ट्विटमुळे ते वादाच्या भोवऱ्यात देखील सापडले होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील त्यांना आदरांजली अर्पण करताना त्यांच्या ट्वीटबाबत प्रकर्षाने उल्लेख केला आहे. एक 'मोकळंढाकळं ट्विट' बंद झालं! असं राज ठाकरेंनी म्हटलंय.
ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विटरवरुन नेहमी स्पष्ट आणि सडेतोड मत व्यक्त केलं. आपले शेवटचे ट्वीट 2 एप्रिलला केले होते. यामध्ये त्यांनी कोरोना व्हायरसविरोधात लढणाऱ्या डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांना सलाम केला होता. तसंच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांवर हल्ल्यांच्या घटनांवर भाष्य केलं होतं. यात त्यांनी म्हटलं होतं की, 'सर्व भाऊ-बहिणींना हात जोडून एक आवाहन. कृपया हिंसा, दगडफेक किंवा लिंचिंगचा अवलंब करु नका. डॉक्टर, नर्स, मेडिक्स, पोलिस वगैरे आपले आयुष्य धोक्यात घालून आपले जीव वाचवत आहेत. आपल्याला हे कोरोना व्हायरस विरोधातील युद्ध जिंकायचे आहे. जय हिंद!'
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी 31 मार्चला केलेलं ट्वीट वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. देशात आणीबाणी घोषित करा, लष्कराला बोलवा; असं ट्विट ऋषी कपूर यांनी केलं होतं. ' आपल्या देशात आज काय होतय, उद्या काय होणार आहे? म्हणून सध्या देशाला लष्कराच्या मदतीची गरज आहे. आणीबाणी', असं ऋषी कपूर यांनी म्हटलं होतं.
Rishi Kapoor Passes Away | शेवटच्या ट्वीटमध्ये ऋषी कपूर यांनी हात जोडून केली 'ही' विनंती
तसंच देशातली परिस्थिती पाहता देशात मद्यविक्रीला परवानगी देण्यात यावी, असं त्यांनी म्हटलं होतं. 'सरकारनं निदान संध्याकाळच्या वेळी परवाना असलेली दारुची दुकानं उघडी ठेवायला हवीत. मला चुकीचं समजू नका. घरात बसलेली लोकं प्रचंड नैराश्यात आहेत. त्यांच्या आजुबाजूला अनिश्चितता आहे. पोलिस, डॉक्टर, आणि नागरिकांवरचा ताण कमी करायचा आहे. तसंही काळ्या बाजारात, चोरून दारुची विक्री सुरूच आहे' असं ऋषी कपूर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
ऋषी कपूर यांनी फारूख अब्दुल्लांच्या वक्तव्याला समर्थन देत वाद ओढवून घेतला होता. पाक व्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचाच भाग आहे. तो कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही असं विधान जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांनी केलं होतं. ऋषी कपूर यांनी अब्दुलांच्या या विधानाचं स्वागत करताना, मला मृत्यूपूर्वी एकदा पाकिस्तानला भेट द्यायची आहे असं ट्विट केलं होतं.
दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणी होत असलेल्या विलंबावर देखील त्यांनी भूमिका मांडली होती. 'निर्भया केस.. तारिख पे तारिख, तारिख पे तारिख - दामिनी' असं त्यांनी म्हटलेलं
रुपेरी पडद्यावरचा आपला अभिनय आणि ट्विटरवर आपले विचार स्पष्टपणे मांडण्यासाठी ऋषी कपूर प्रसिद्ध होते. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांचं 27 एप्रिल 2017 रोजी कर्करोगाने निधन झाल्यानंतर विनोद खन्ना यांच्या अंत्यदर्शनासाठी नव्या दमाचा एकही कलाकार उपस्थित राहिला नव्हता. याचा ऋषी कपूर यांना संताप आला होता. 'लज्जास्पद आहे हे. विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्कारात या पिढीतील एकही अभिनेता सहभागी झाला नव्हता. त्यांच्याबरोबर काम केलेलेही (कलाकार) आले नाहीत. जेव्हा माझं निधन होईल, माझी मनाची तयारी असलीच पाहिजे. कोणीही मला खांदा देऊ नये. आजच्या तथाकथित स्टार्सचा खूप राग आला आहे' असं ऋषी कपूर यांनी लिहिलं होतं.