बिग बी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचं खास नातं होतं. त्यांच्या निधनानं बिग बींना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. ' आज सकाळीतो निघून गेला…ऋषी कपूर… तो निघून गेला… त्याचा मृत्यु झाला आहे मी खरंच खचलोय, उद्धवस्त झालोय”, असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं होतं. नंतर त्यांनी ते ट्वीट डिलीट केलं.
भारतरत्न लता मंगेशकर यांना देखील ऋषी कपूर यांच्या जाण्याने धक्का बसला आहे. 'काय बोलू?, काय लिहू काही समजत नाहीये, ऋषीजींच्या जाण्याने खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या जाण्याने सिनेक्षेत्राची मोठी हानी झालीय. हे दु:ख सहन करणं माझ्यासाठी कठिण आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो' असं लता मंगेशकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.
अभिनेता आमीर खान यानं देखील ऋषी कपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ऋषी कपूर यांच्या निधनाने खूप मोठी हानी झालीय. ते जबरदस्त कलाकार तर होतेच मात्र एक चांगले माणूस देखील होते. आम्हाला आनंद दिल्याबद्दल आभार, तुम्ही आमच्या स्मरणात नेहमी राहाल, असं आमीरने म्हटलं आहे.
ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी देखील ट्वीट करत ऋषी कपूर यांना आदरांजली अर्पण केलीय. माझ्या प्रिय मित्रा, रेस्ट इन पीस असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.