ऋषी कपूर हे ट्विटरवर खूप सक्रिय होते. त्यांच्या ट्वीटची नेहमी चर्चा व्हायची. अनेकदा त्यांनी केलेल्या ट्विटमुळे ते वादाच्या भोवऱ्यात देखील सापडले होते. त्यांनी आपले शेवटचे ट्वीट 2 एप्रिलला केले होते. यामध्ये त्यांनी कोरोना व्हायरसविरोधात लढणाऱ्या डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांना सलाम केला होता. तसंच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांवर हल्ल्यांच्या घटनांवर भाष्य केलं होतं. यात त्यांनी म्हटलं होतं की, 'सर्व भाऊ-बहिणींना हात जोडून एक आवाहन. कृपया हिंसा, दगडफेक किंवा लिंचिंगचा अवलंब करु नका. डॉक्टर, नर्स, मेडिक्स, पोलिस वगैरे आपले आयुष्य धोक्यात घालून आपले जीव वाचवत आहेत. आपल्याला हे कोरोना व्हायरस विरोधातील युद्ध जिंकायचे आहे. जय हिंद!'
वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांना एक आठवड्यापासून रुग्णालयात उपचार सुरु होते. ऋषी कपूर यांचे बंधू रणधीर कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सलग दुसऱ्या दोन कलाकार गमावल्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
"कॅन्सरच्या आजारातील गुंतागुंतीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ते मागील एक आठवड्यापासून तिथेच आहेत. यावेळी उपचारादरम्यान त्यांना अनेक वेळा व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं," अशी माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू सिंह या त्यांच्यासोबत रुग्णालयात होत्या.
ऋषी कपूर मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील न्यूयॉर्कमधून कॅन्सरचा इलाज करुन मुंबईत परतले होते. या उपचारादरम्यान ऋषी कपूर अमेरिकेतील रुग्णालयात 11 महिने आणि 11 दिवस होते. तिथून परतल्यानंतर उपचार यापुढेही सुरु राहतील आणि ठणठणीत बरं होण्यासाठी काही काळ लागेल, असं त्यांनी सांगितलं होतं.