Rinku Rajguru Kedarnath spiritual experience interview: 'आर्ची' अर्थात रिंकू राजगुरू आपल्या अभिनय आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. तिनं आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं.  रिंकू बऱ्याचदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे.  रिंकू राजगुरू सोशल मीडियातही प्रचंड सक्रीय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतात.  दरम्यान, रिंकू  सध्या चित्रपटामुळे नसून,  अध्यात्मिक बाजू सांगितल्यामुळे चर्चेत आली आहे. तिनं एका मुलाखतीत केदारनाथमध्ये आलेला अनुभव शेअर केला आहे. हा अनोखा अनुभव ऐकून नक्कीच तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.  

राजश्री मराठीला अलिकडेच अभिनेत्री रिंकू राजगुरूने मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिनं  वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.  तिला या मुलाखतीत तिची अध्यात्मिक बाजू विचारण्यात आली. तिनं यावेळी केदारनाथमध्ये गेल्यानंतर आलेला अनुभव सांगितला. 'आधी मी नास्तिक होते.  मी केदारनाथला गेले होते. त्यानंतर मला अध्यात्मिक गोष्टींकडे विश्वास बसू लागला. मी नंतर उपवास धरू लागले.  पूजा पाठ करू लागले.  मला नंतरही अनुभव आले.  खरंतर  पूजा पाठ, सण उत्सव  यामागे काही वैज्ञानिक कारणंही आहेत. कुठलीतरी शक्ती आहे. जेव्हा इच्छाशक्ती प्रबळ असते, तेव्हा आपण त्या गोष्टींकडे वळतो".

"माझ्याबाबतही असंच काहीसं घडलं. माझ्या आयुष्यात काही गोष्टी घडल्या, ज्यामुळे मी या गोष्टींवर विश्वास ठेवू लागले.  मी सकाळी देव पूजा, जप करते,  मला या गोष्टी करताना आनंद मिळतो", असं अभिनेत्रीनं सांगितलं.  केदारनाथमध्ये आलेल्या अनुभवाबाबत रिंकू म्हणाली, "माझा अनुभव खरंतर हा कधीही न विसरणारा आहे. माझी अचानक केदारनाथला जाण्याची इच्छा झाली. मी गेले.  गुरूवारी पौर्णिमेच्या दिवशी मी चालत गेले.  दर्शन घेतल्यानंतर मला हेलिकॉप्टरमधून जायचं होतं. कारण दुसऱ्या दिवशी माझी प्लाइट होती. पाय दुखले, मी खूप थकले, रडले...  तिथे एक मला माणूस म्हणाला होता की, हेलिकॉप्टर मिळेल.  दोन तीन तास यासाठी आम्ही थांबलो.  पण हेलिकॉप्टर काही आलं नाही. अंधार व्हायला लागला".

"मी देवाला म्हटलं हेलिकॉप्टर येऊ दे, मी कुटुंबासह दर्शनाला येईन.  नंतर एक माणूस आला आणि मला म्हणाला की हेलिकॉप्टर मिळणार नाही.   मला खूप त्रास झाला.  मी चिडले. मी देवाला म्हटले की,  हा काय देव आहे, हेलिकॉप्टर हवाय तर मिळत नाही, असं म्हणत पुढे गेले. एक व्यक्ती आला आणि म्हणाला, हेलिकॉप्टरमध्ये  दोन सीट आहेत.  मी आनंदात पळत गेले पण खाली पडले. माझ्या गुडघ्याला लागलं.  मी देवाला म्हटलं, पुढे कधीच तक्रार करणार नाही. कारण मला त्याच क्षणी मला शिक्षा मिळाली होती", हा किस्सा तिनं मुलाखतीतून शेअर केला.