Ravi Jadhav Breaks Silence on Exit From Raja Shivaji: अभिनेता रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) सध्या 'राजा शिवाजी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन तसेच अभिनय रितेश देशमुख स्वत: करणार आहे. या चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. हा बिग बजेट सिनेमा असणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, रितेश देशमुख याचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट सुरूवातीला दिग्दर्शक रवी जाधव दिग्दर्शित करणार होते. मात्र, काही कारणांमुळे आता रवी जाधव नसून, या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुख करणार आहेत. रवी जाधव यांना या चित्रपटातून माघार घ्यावी लागली. दरम्यान, रवी जाधव आणि रितेश देशमुख यांच्यात वाद झाले असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, रवी जाधव यांनी चित्रपटातून काढता पाय का घेतला? यावर रवी जाधव एका मुलाखतीत स्पष्टच बोलले आहेत.
एका पॉडकास्टमध्ये रवी जाधव यांनी रितेश देशमुखसोबत झालेल्या भांडणाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे, “माझ्यात आणि रितेश देशमुखमध्ये एकही शब्दाचं भांडण नाही. मी ‘राजा शिवाजी’च्या शूटिंगला गेलो होतो. रितेश देशमुख ज्या पद्धतीने तो सिनेमा दिग्दर्शित करत आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आहे, त्याला खरंच हॅट्स ऑफ".
"आम्ही 2014–15 मध्ये एक छोटं स्वप्न बघितलं होतं. तो सिनेमा बारा कोटी, पंधरा कोटीत कसा बनेल असं इमॅजिन केलं होतं. पण आज ज्या स्केलवर तो सिनेमा बनतो आहे, ती स्केल आम्ही तेव्हा पाहिली नव्हती. शेवटी काय महत्वाचं आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा बनतो आहे. तो मोठ्या पद्धतीने, योग्य साथ मिळून बनतो आहे, आणि त्याच्या आड कोणीही येऊ नये. महाराष्ट्रातल्या कोट्यवधी लोकांचं आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांचा सिनेमा बनतोय. तो झालाच पाहिजे, आणि आपण सगळे त्यात सहभागी झाले पाहिजे”, असं रवी जाधव यांनी स्पष्ट केलं.
रवी जाधव यांची पॉडकास्ट आणि त्याच्या कॅप्शनमध्ये रवी जाधव यांनी दिलेलं उत्तर, रितेश देशमुख याने सोशल मीडियात शेअर केले आहे. त्यानं कॅप्शनमध्ये म्हटलं की, "जेव्हा मैत्री असते तिथे समजूतदारपणा असतो!! एक उत्तम चित्रपट निर्माते आणि माझ्या आवडत्यांपैकी एक आहेस #रवी जाधव. देवा, तुमच्या कृपेबद्दल धन्यवाद. 'राजा शिवाजी' हा माझा चित्रपट नाही तर आमचा चित्रपट आहे. हा आमचा राजा, आमचा नायक, #छत्रपतीशिवाजीमहाराज यांना श्रद्धांजली."