Continues below advertisement

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांची (Election) रणधुमाळी सुरू आहे, त्यातच राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो, असे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी म्हटले. 'एबीपी माझा'च्या 'कॉफी विथ कौशिक' या पॉडकास्टमध्ये अजित पवार (Ajit pawar) यांनी याबाबत भाष्य केले. दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत, पण शरद पवारांची राष्ट्रवादी घड्याळाच्या राष्ट्रवादीत मर्ज होणार का? या अनुषंगाने बोलताना अजित पवारांनी भूमिका मांडली. तर, पुणे (Pune)आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असून अद्याप प्रचारात नेते एकत्र दिसले नाहीत. त्यामुळे, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे प्रचारात कधी सक्रीय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. अखेर, आजपासून रोहित पवार अजित पवारांसोबत प्रचारात सक्रीय होत आहेत.

रोहित पवार आजपासून अजित पवार यांच्यासमवेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत. आज सकाळीच एबीपी माझाशी बोलताना अजित पवार यांनी लवकरच सुप्रिया सुळे, रोहित पवार, निलेश लंके पिंपरी चिंचवड पुणे महानगर पालिकेच्या प्रचारात दिसतील, असे सुतोवाच केले आहेत. त्यामुळे, रोहित पवार आज तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासोबतच घड्याळ चिन्हाचा देखील प्रचार करणार आहेत. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपवर आणि पुणेपिंपरीतील भाजप नेत्यांवर हल्लाबोल करत आहेत. त्यामुळे, आज काका अजित पवार यांच्यासोबत रोहित पवार हेही भाजपला लक्ष्य करतील का, भाजपवर टीका करतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Continues below advertisement

दोन राष्ट्रवादी मर्ज होण्याबाबत काय म्हणाले अजित पवार

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र यायचे की नाही, याचा विचार अजून मी केलेला नाही. सध्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. त्यामुळे रोज उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचारापर्यंत खूप कामं असतात. त्यामुळे या सगळ्या गोंधळात दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याबद्दल अजून मी विचार केलेला नाही. पण साधारण दोन्ही पक्षांचे खालचे कार्यकर्ते यामुळे समाधानी असल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय जीवनात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो, एवढंच मी सांगतो. यावरुन काय ओळखायचंय ते ओळखा, असे सूचक विधान अजित पवार यांनी केले.

हेही वाचा

शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार