Who is Major Mohit Sharma Dhurandhar Movie: भारतीय सेनेच्या शौर्यगाथांमध्ये काही अशी नावं आहेत, ज्यांचा उल्लेख झाला की छाती अभिमानाने रुंद होते. अशाच नावांपैकी एक म्हणजे स्पेशल फोर्सचे जांबाज कमांडो मेजर मोहित शर्मा. त्यांच्या बहादुरीने आणि दूरदृष्टीने भारताच्या सुरक्षाव्यवस्थेला नवी ताकद दिली. आता त्यांच्या असामान्य आयुष्याची आणि गुप्त मोहिमांची कहाणी दिग्दर्शक आदित्य धर मोठ्या पडद्यावर ‘धुरंधर’च्या रूपाने मांडत आहे. ज्यात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसतील. या अमर योद्ध्याची कथा इतकी वास्तविक  आहे की ती जाणून घेतली की प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल.

Continues below advertisement


पाकव्याप्त  काश्मीरमध्ये  घुसून दहशतवाद्यांचा खात्मा


मेजर मोहित शर्मा यांचं नाव त्या मोजक्या भारतीय अधिकाऱ्यांत घेतलं जातं, ज्यांनी दहशतवादाच्या मुळावर घाव घालण्यात ऐतिहासिक भूमिका बजावली. 2004 मध्ये दक्षिण काश्मीरमध्ये झालेल्या अत्यंत गोपनीय मोहिमेत त्यांनी ‘इफ्तिखार भट’ या नावाने हिजबुल मुजाहिदीनमध्ये घुसखोरी केली. लांब दाढी, काश्मिरी लहेजा आणि ‘मारल्या गेलेल्या भावाची’ काल्पनिक कहाणी यामुळे त्यांची अंडरकव्हर ओळख इतकी मजबूत बनली की दहशतवादी त्यांना स्वतःच्याच गटातील मानायला लागले.


या काळात त्यांनी हिजबुलचे नेटवर्क, शस्त्रांचे ठिकाण, संपर्क सूत्रे आणि पुढील रणनीती यांसारखी अत्यंत महत्त्वाची माहिती मिळवली. असंही म्हटलं जातं की एका टप्प्यावर ते पाक अधिकृत भागातही गेले होते, जिथे दहशतवाद्यांच्या मध्ये राहून त्यांनी महत्त्वाची माहिती मिळवली. त्यांच्या ओळखीवर संशय घेतला असतानाही त्यांनी धैर्य आणि चातुर्य दाखवत परिस्थिती पालटली. संधी साधून त्यांनी दोन धोकादायक दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली.


जखमी असूनही चार दहशतवाद्यांना केलं ठार


2009 मध्ये उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील मोहिमेनं त्यांना अमर शहीदांच्या पंक्तीत स्थान दिलं. घनदाट जंगलात दहशतवाद्यांनी भारतीय पथकावर अचानक गोळीबार केला. त्यावेळी चार सैनिक जखमी झाले, पण मेजर मोहित यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून गोळीबारात प्रवेश केला. दोन जखमी जवानांना त्यांनी सुरक्षित स्थळी पोहोचवलं आणि स्वतःच्या छातीवर गोळ्या झेलूनही चार दहशतवाद्यांना ठार केलं. हे शौर्य कोणत्याही कथेतलं नव्हे, तर एका भारतीय सैनिकाचा  खरा पराक्रम आहे.


मेजर मोहित याचं बहुगुणी व्यक्तिमत्व


रोहतक येथे जन्मलेले मेजर मोहित हे फक्त शूर सैनिकच नव्हते, तर उत्तम कलाकारही होते. गिटार, माउथ ऑर्गन आणि सिंथेसायझर यांसारख्या वाद्यांमध्ये ते निपुण होते आणि अनेकदा लाइव्ह परफॉर्मन्स देत असत. NDA आणि IMA मध्येही ते सर्वोत्तम कॅडेट्समध्ये गणले जात. 1 पॅरा (स्पेशल फोर्स) मध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी आपल्या कामगिरीने सेना­त वेगळी ओळख निर्माण केली. बेलगावीतील कमांडो विंगमध्ये ते प्रशिक्षकही होते, जिथे त्यांनी अनेक जवानांना स्पेशल फोर्सेससाठी तयार केलं.


मेजर मोहित शर्मा यांचं कुटुंब


मेजर मोहित यांचा जन्म हरियाणातील रोहतक येथे झाला आणि त्यांचं पैतृक मूळ उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातल्या रसना गावात होतं. त्यांच्या वडिलांचं नाव राजेंद्र प्रसाद शर्मा आणि आईचं नाव सुशीला शर्मा. मोठ्या भावाचं नाव मधुर शर्मा असून त्यांनी नेहमीच मेजर मोहित यांच्या संघर्षाचा आणि यशाचा साक्षीदार राहिला आहे. घरी त्यांना ‘चिंटू’ या नावानं हाक मारली जात असे, तर आर्मीमध्ये त्यांना ‘माइक’ म्हणून ओळखलं जायचं.


त्यांची पत्नी मेजर ऋषिमा शर्मा सुद्धा भारतीय सेनेत अधिकारी होत्या आणि दोघेही एक आदर्श सैनिकी दाम्पत्य म्हणून ओळखले जात. त्यांच्या शहादतीच्या वेळी दाम्पत्याला मूल नव्हतं, पण कुटुंब, गाव आणि देशासाठी ते सदैव अभिमानाचा विषय राहिले.


‘धुरंधर’ कधी रिलीज होणार?


धुरंधर चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी रिलीज होणार आहे.स्टारकास्टमध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असून, त्यांच्यासोबत R. माधवन, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि राकेश बेदी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील.2009 मध्ये मेजर मोहित यांना अदम्य साहस, नेतृत्व आणि सर्वोच्च बलिदानासाठी मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांचं नाव भारतीय लष्कराच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं आहे.