Satara Nagar Palika Election: सातारा नगरपालिका निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी मनोमिलन केलं आहे. मात्र, दोघांकडील इच्छुक कार्यकर्त्यांना उमदेवारी न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी देत दोन्ही राजेंच्याच उमेदवारांच्या विरोधात शड्डू ठोकून आव्हान दिलं आहे. त्यामुळे दोन्ही राजेंची डोकेदुखीत वाढ झाली आहे. आम्ही अनेक वर्ष दोन्ही राजेंचं काम केलं, यांच्यासोबत समाजकार्य करून देखील आम्हाला डावलले गेल्याचा आरोप या अपक्ष उमेदवारांनी केला.

Continues below advertisement


अनेक ठिकाणी बंडखोरांनी आव्हान उभे केले


दोन्ही राजेंचे मनोमिलन झालं असले तरी खाली कार्यकर्त्यांचे मात्र मतमिलन झालेलं नाही, त्यामुळे बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवारांचा फटका या दोन्ही राजेंना किती बसतो हे 3 डिसेंबरलाच कळणार आहे. भाजपने अनेकांना पक्षात घेऊन उमेदवाऱ्या दिल्या. ऐनवेळी पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर भाजपविरोधातील मंडळी आगपाखड करू लागले आहेत. अतिशय शेलक्या शब्दांमध्ये ते पक्षातून बाहेर पडलेल्यांवर तोंडसुख घेतानाही पाहायला मिळत आहेत. उदयनराजे भोसले व ना. शिवेंद्रराजे भोसले या दोन्ही राजेंची एकत्रित मोट बांधण्यात भाजपला यश आले असले तरी अनेक ठिकाणी बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. 


नऊ नगरपालिका व एका नगरपंचायतीच्या निवडणुकीचे घमासान


दरम्यान, जिल्ह्यात नऊ नगरपालिका व एका नगरपंचायतीच्या निवडणुकीचे घमासान सुरू आहे. सातारा, कराड, मलकापूर, वाई, फलटण, महाबळेश्वर, पाचगणी, म्हसवड, रहिमतपूर या नगरपालिका व मेढा नगरपंचायतीसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी महायुतीतच घमासान सुरु आहे. भाजपने स्वबळ आजमावण्याचा प्रयत्न केला असून घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी भाजपविरोधात शड्डू ठोकला आहे. वाईत राष्ट्रवादी विरुध्द भाजप सामना रंगला आहे. मकरंद पाटील, जयकुमार गोरे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. गोरे यांच्या रसदीमुळे माजी आमदार मदन भोसले गटाला ताकद मिळाली आहे. फलटणमध्ये अजित पवार आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे गटाला आव्हान दिलं आहे. रहिमतपुरात अजित पवार, मकरंद पाटील, नितीन पाटील यांनी सुनील माने यांचे हात बळकट केले आहेत. काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) यांना सोबत घेऊन त्यांनी भाजपचे  मनोज घोरपडे यांना आव्हानं दिलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या