Kagal Nagar Palika Election: कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय विद्यापीठ समजलं जाणाऱ्या कागल नगरपालिका निवडणुकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची अनपेक्षित युती झाल्याने अवघ्या राजकारणाला कलाटणी मिळाली. जे दोन गट एकमेकांविरोधात टोकाची ईर्षा करून संघर्ष करत होते, इतकेच नव्हे तर अनेक कार्यकर्त्यांची डोकं फुटण्याची वेळ आली त्याच ठिकाणी आता मांडीला मांडी लावून मुश्रीफ आणि समरजीत कागल नगरपालिकेमध्ये एकत्रितपणे प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांची मात्र गोची झाली आहे. ते या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एकटे पडल्याने त्यांची ताकद दुबळी पडल्याची चर्चा सुद्धा सुरू आहे. 

Continues below advertisement

कागलच्या उमेदवारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली

दरम्यान, आता कागलमधील घडामोडींवर 'अदृश्य' शक्तीचा हात असतानाच आता थेट शिवसेना शिंदे गटाची ताकद सुद्धा आता कागलच्या निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे. थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कागलच्या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं आहे. काल (23 नोव्हेंबर) कोल्हापूर दौऱ्यामध्ये कागल नगरपालिकेच्या उमेदवारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी प्रचारास सुद्धा येण्याचे आश्वासन दिलं. त्यामुळे कागलमध्ये 28 किंवा 29 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचार सभा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये आणखी रंगत भरणार आहे. 

प्रचार करताना कार्यकर्त्यांना धमकीबाजी

दुसरीकडे समरजित आणि मुश्रीफ यांनी एकत्रितपणे प्रचार करताना कार्यकर्त्यांना सुद्धा धमकीबाजी सुरू केली आहे. आपली इज्जत पणाला लागल्याचे सांगत कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारच्या निगेटिव्ह चर्चा न करण्याचे आवाहन मुश्रीफ यांनी केलं आहे. जर कोणी निगेटिव्ह चर्चा करताना आढळलेत तर त्यांची खैर नाही अशा शब्दांमध्ये मुश्रीफ यांनी इशारा दिला आहे. मुश्रीफ यांनी ज्या वाॅर्डमध्ये मते कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवा, आपलं काही खरं नाही अशा शब्दात धमकी वजा इशारा दिला. उमेदवार बाहेरच्या वाॅर्डातील आहे म्हणून कोणी दुर्लक्ष करू नका. घराजवळचा उमेदवार आहे म्हणून तुमच्या घरात सोन्याच्या खापऱ्या घालणार आहे का? अशी सुद्धा विचारणा हसन मुश्रीफ यांनी यावेळी केली. दुसरीकडे समरजित यांनी सुद्धा त्याच पद्धतीने इशारा दिला आहे. त्यामुळे आता दोन गट एकत्र आले तरी खाली कार्यकर्त्यांचे मनोमिलन अजूनही झालं नसल्याचे या दोन्ही नेत्यांच्या भाषेतून दिसत आहे. त्यामुळे कागलच्या निवडणुकीमध्ये संजय मंडलिक त्यांच्या नाराजीचा फायदा घेणार का? याचीही उत्सुकता आहे. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या