Ranveer Singh : 'बँड बाजा बारात' ते 'गली बॉय' असा भन्नाट प्रवास करणाऱ्या रणवीर सिंगचा बॉलिवूडमधला दहा वर्षांचा प्रवास आज पूर्ण झालाय. त्याने आज हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करुन दहा वर्ष पूर्ण झाली. बॉलिवूडमधील सध्याचा आघाडीचा अभिनेता म्हणून रणवीरची ओळख आहे. रणवीरनं अनेक रोमँटिक ते थरारक अंदाजातील भूमिका निभावत चाहत्यांचं प्रेम मिळवलं आहे. उडवणाऱ्या खलनायकापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. आपल्या अनोख्या अभिनय शैलीच्या जोरावर त्याने बॉलिवूड सिनेसृष्टीत स्वत:चं असं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. परंतु त्याचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर त्याला 'बँड बाजा बारात' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती.


सिंबा, बाजीराव अशा भूमिकांनी आपलं वलय निर्माण करणाऱ्या रणवीरला कारकिर्दीच्या सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला. काम मिळवण्यासाठी त्याला अनेक उंबरे झिजवावे लागले. मात्र आपल्या मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने बॉलिवूडवर दहा वर्षात राज्य केलं आहे.


एका मुलाखतीत रणवीरनं सांगितलं होतं की, लहानपणापासूनच मला अभिनयाची प्रचंड आवड होती. लोकांना आश्चर्यचकित करायला मला खूप आवडतं. याच स्वभावनं मला बॉलिवूडच्या दिशेने आकर्षित केलं. तो म्हणाला की, कुटुंबातील काही लोकांची बॉलिवूडमध्ये थोडीफार ओळख होती. त्यामुळे मला सहज काम मिळेल असं वाटत होतं. पण माझा भ्रमनिरास झाला. जवळपास सहा वर्ष मी कामाच्या शोधात होतो. अनेक निर्मात्यांना भेटलो. ऑडिशन्स दिल्या. निर्मात्यांच्या ऑफिसबाहेर तासनतास बसायचो पण काम मिळत नव्हतं, असं रणवीरनं सांगितलं होतं.


रणवीरनं सांगितलं की, चित्रपटांमध्ये एक्स्ट्रा आर्टिस्ट म्हणून काम शोधू लागलो. त्याचवेळी मला बँड बाजा बाराज या चित्रपटाविषयी माहिती मिळाली अन् मी ऑडिशन दिलं. सुरुवातीला रणबीर कपूर या चित्रपटात झळकणार होता परंतु त्याने तो चित्रपट सोडला त्यामुळे मला काम करण्याची संधी मिळाली. सुदैवानं प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला. परिणामी इतर निर्मात्यांनी देखील माझ्यावर गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली, असं त्यानं सांगितलं.


रणवीरने बँड बाजा बारात नंतर रामलीला, पद्मावती, लुटेरा, गुंडे, बाजीराव मस्तानी, गली बॉय, सिंबा असे एकापेक्षा एक सरस चित्रपट केले. गली बॉयला भारताकडून ऑस्करसाठी देखील पाठवण्यात आले होते. आता त्याच्या आगामी 83 या चित्रपटाची प्रतिक्षा आहे.