मुंबई : सुशांतच्या मृत्यूचे वेगवेगळे कंगोरे आता कळू लागले आहेत. नवनव्या गोष्टी तपासात येऊ लागल्या आहेत. आधी मुंबई पोलिस मग सीबीआय मग ईडी मग नार्कोटिक्स असे वेगवेगळे विभाग यावर काम करू लागले आहेत. एकीकडे सुशांतचे मित्र, त्याच्या संपर्कात आलेली मंडळी, रिया चक्रवर्ती यांची चौकशी चालू असतानाच आता त्यातल्या चौकशीत समोर आलेल्या काही गोष्टींमुळे सुशांतचे कुटुंबीयच गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेकांना हे अति वाटेल पण होय, अब बारी सुशांत के घरवालों की है.


एकीकडे रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप सुरू असताना रिया मात्र कुठेच काही बोलत नव्हती. मात्र तिने एक मुलाखत दिली आणि पूर्ण काळं असणाऱ्या या चित्राचे रंग बदलू लागले. रियाच्या त्या मुलाखतीनं खूप फरक पडला. सुशांतशी संबंधित वेगवेगळ्या लोकांशी चौकशी करतानाच सुशांतच्या मॅनेजरचाही मोबाईल चेक करण्यात आला. त्यावेळी मात्र सुशांतच्या कुटुंबियांना सुशांतच्या मानसिक आजाराची कल्पना होती असं लक्षात आलं आहे. सुशांतच्या मॅनेजरचा फोन तपासल्यानंतर सुशांत त्याच्या डिप्रेशनसाठी जी हेवी औषधं घेत होता त्याची कल्पना त्या मॅनेजरने त्याच्या बहिणीला दिलेले हे मेसेज आहेत. डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शनच त्या मॅनेजरने बहिणीला पाठवल्याचे संदर्भ यात आहेत. यावरून सुशांत नैराश्यग्रस्त आहे हे आपल्याला माहित नव्हतं असा दावा जो सुशांतचे कुटुंबिय करतायत त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं.


इतकंच नव्हे, तर सुशांत काही वेळा दवाखान्यातही दाखल होत असे. त्यावेळी सुशांतचे वडील मुंबईत येण्यासंदर्भात रियाकडे चौकशी करत असल्याचंही यात दिसतं आहे. मग खरंच सुशांतच्या कुटुंबियांना त्याच्या आजाराची कल्पना नव्हती का? जर कल्पना होती तर त्याची काळजी घेण्यासाठी त्याचे कुटुंबीय का पुढे सरसावले नाहीत? असे काही प्रश्न निर्माण होतात. इतकंच नव्हे, तर सुशांत नैराश्यग्रस्त आहे हे जर कुटुंबियांना माहीत होतं आणि रियाने 8 जूनला सुशांतचं घर सौडलं आहे याची कल्पना त्यांना होती, तर कुटुंबियांनी सतत त्याच्यासोबत राहाणं गरजेचं होतं पण तसं का झालं नाही असेही प्रश्न आहेत.


रियाने दिलेल्या मुलाखतीतही 8 जूनला जेव्हा रियाने सुशांतचं घर सोडलं तेव्हा सुशांतची बहीण मिटू त्याच्या बांद्र्याच्या फ्लॅटवर आली होती असंही तिनं म्हटलं आहे. त्यामुळे रियाने घर सोडल्यावर तिची डिजिटल टीम सुशांतच्या घरी गेली होती का आणि जर असेल तर मिटूला याबद्दल काहीच कसं माहीत नाही असेही प्रश्न विचारले जातायत. त्यामुळे आता लवकरच सुशांतच्या कुटुंबियांनाच या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :