Raj Thackeray paid tributes to Actress Jyoti Chandekar : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर ज्योती चांदेकर यांच्यावर आज (दि.17) वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी ज्योती चांदेकर यांची कन्या तेजस्विनी पंडित हिने त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. राज ठाकरे यांनी यावेळी ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, आई ज्योती चांदेकर यांना निरोप देताना अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा अश्रूचा बांध फुटला. आईचं निधन झाल्यानंतर तेजस्विनी पंडितने इन्स्टाग्राम स्टोरीवरुन भावनांना वाट करुन दिली होती. ज्योती चांदेकर यांच्या जाण्याने मराठी चित्रपट कला विश्वात शोककळा पसरली आहे. मराठीतील कलाकारांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली. ज्योती चांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या आजाराबद्दल नेमकी माहिती दिली गेलेली नसली तरी त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ज्योती चांदेकर यांनी वयाच्या 12 व्या वर्षी रंगभूमीवर अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीला त्यांनी हिंदी चित्रपटांत लहानसहान भूमिका केल्या, त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. पुढे त्यांनी दूरदर्शनवरील मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका निभावल्या. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. ‘ठरलं तर मग’ या मालिकेतल्या ‘पूर्णा आजी’ या भूमिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या. सिनेक्षेत्रातील कारकिर्दीत त्यांना तब्बल 200 हून अधिक पुरस्कार मिळाले.
त्यांचं अकस्मात झालेलं निधन मराठी चित्रपटसृष्टीसाठी आणि चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरलं आहे. ज्योती चांदेकर यांची शेवटची मालिका प्रसारित करणाऱ्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने सोशल माडियावरुन शोक व्यक्त केलाय. समृद्धी केळकर, समीर परांजपे, सुरेखा कुडाची यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनीही त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या