गुरुग्राम : यूट्यूबर आणि बिग बॉस OTT विजेता एल्विश यादवच्या गुरुग्राम येथील निवासस्थानी आज रविवारी पहाटे अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंध गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास सेक्टर 57 मधील यादव यांच्या घराबाहेर तीन हल्लेखोर मोटारसायकलवर आले. त्यांनी घरावर तब्बल 25 ते 30 
गोळ्या झाडल्या. गोळ्या घराच्या खालच्या आणि पहिल्या मजल्यावर लागल्या. सुदैवाने यादव दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर राहत असून, हल्ल्याच्या वेळी घरी नव्हते. मात्र त्यावेळी घरातील केअरटेकर आणि काही कुटुंबीय उपस्थित होते. या हल्ल्यात कुणालाही दुखापत झालेली नाही.


नेमकं काय घडलं?


गुरुग्राम पोलिसांचे PRO संदीप कुमार यांनी सांगितले की, "तीन व्यक्ती मास्क लावून घरासमोर आले आणि गोळीबार केला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून, फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत. पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल." दरम्यान, एल्विशच्या वडिलांनी सांगितले की, "आम्ही झोपलो होतो. त्यावेळी तीन लोक आले. एक जण बाइकवर बसला होता, तर दोघे खाली उतरून गोळीबार करू लागले. त्यांनी 25 ते 30 राऊंड फायर केले आणि पळून गेले. एल्विशला याआधी कोणतीही धमकी मिळालेली नव्हती. सध्या तो कामानिमित्त शहराबाहेर आहे."


27 वर्षीय एल्विश यादवने यूट्यूबच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवली. 2023 मध्ये बिग बॉस OTT 2 विजेता ठरल्यानंतर त्याचा चाहता वर्ग प्रचंड वाढला. त्याने म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र, यादव अनेकदा वादांच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेल्या वर्षी नोएडा पोलिसांनी त्याला सापाच्या विषासंदर्भातील प्रकरणात अटक केली होती. रेव्ह पार्टीमध्ये कोब्रा विष ड्रग्स म्हणून वापरले जात असल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्याला नंतर जामिनावर सोडण्यात आलं, परंतु या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया अजून सुरू आहे.


घरावरती गोळीबार झाल्याची माहिती समजताच एल्विश यादवचे चाहते आणि सोशल मीडियावर युजर्स यांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी सांगितले की ते आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि लवकरच हे प्रकरण उघड करण्याचा प्रयत्न करतील. जर एल्विशने तक्रार दाखल केली तर तपास अधिक वेगात होऊ शकतो.


एल्विश यादव कोण?


एल्विश यादव हा एक प्रसिद्ध युट्यूबर, कंटेंट क्रिएटर आणि गायक आहे. त्याचे कॉमेडी व्हिडिओ, व्लॉग आणि रोस्ट व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होतात. त्याचे खरे नाव सिद्धार्थ यादव आहे. एल्विशने 2016 मध्ये युट्यूबवर काम करण्यास सुरुवात केली आणि फेब्रुवारी 2018 पर्यंत दहा लाख सबस्क्राइबर्स मिळवले. आज त्याच्या यूट्यूब चॅनेलवर 15 दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत, फेसबुकवर 4.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्याने बिग बॉस ओटीटी 2 आणि लाफ्टर शेफ 2 हे शो जिंकले आहेत. त्याचे मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग आहे.