Actress Jyoti chandekar Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी शनिवारी (16 ऑगस्ट) निधन झालंय. दीर्घकाळ आजाराशी झुंज देत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्टार प्रवाहच्या 'ठरलं तर मग 'या मालिकेत पूर्ण आजीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या जाण्याने प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसलाय.
चाहत्यांनी व्यक्त केल्या भावना
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या प्रगल्भ कलाकारांमध्ये ज्योती चांदेकर यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्यांनी साकारलेली मी सिंधुताई सपकाळ या सिनेमातील सिंधुताईंची भूमिका चांगलीच गाजली. अनेक मालिका नाटक आणि सिनेमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या. दरम्यान ठरलं तर मग मालिकेतील चाहत्यांची लाडकी पूर्ण आजी आता जगात नाहीये यावर चाहत्यांचा विश्वास बसत नसल्याचं अनेकांनी सोशल मीडिया अकाउंटवर कमेंट करत म्हटलंय. स्टार प्रवाहने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर एक पोस्ट करत ज्योती चांदेकरांना श्रद्धांजली वाहिली .या पोस्ट खाली अनेक चाहत्यांनी 'पूर्णा आजीला ' श्रद्धांजली वाहिलीये .अनेकांनी आपल्या भावना या पोस्टवर व्यक्त केल्यात .अनेकांनी या घटनेवर विश्वास बसत नसल्याचं म्हटलं . 'महासंगममधील परवाच्या भागात त्यांच्या तोंडून श्रीकृष्णाची महती ऐकून छान वाटलं होतं .खूप सुंदर बोलल्या होत्या' .असं आहे एका नेटकऱ्यानं म्हटलं . कालचा एपिसोड मध्ये किती छान दिसत होत्या, हे फारच शॉकिंग आहे .. अशा कमेंट्स मधून चाहत्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात .
पाच दशकांहून अधिक या क्षेत्रात सक्रीय
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर या मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाच्या कलाकार होत्या. केवळ बारा वर्षांच्या वयात त्यांनी अभिनयाची सुरुवात केली आणि तब्बल पाच दशकांहून अधिक काळ त्या या क्षेत्रात सक्रीय राहिल्या. गुरू, ढोलकी, तिचा उंबरठा, पाऊलवाट, सलाम, सांजपर्व यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. तसेच दूरदर्शनवरील तू सौभाग्यवती हो आणि छत्रीवाली या मालिकांमधूनही प्रेक्षकांच्या मनात त्यांनी ठसा उमटवला.
त्यांची कन्या तेजस्विनी पंडित हिच्यासोबत त्यांनी मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटात भूमिका केली. या चित्रपटात दोघींनीही सिंधुताईंच्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांचे चित्रण साकारले होते. या अभिनयासाठी त्यांचे खूप कौतुक झाले आणि अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले. ज्योती चांदेकर यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीसाठी त्यांना प्रतिष्ठेचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.