मुंबई : देशातील नावाजलेला उद्योगपती राज कुंद्रापर्यंत पॉर्न फिल्म रॅकेटचे धागेदोरे कसे पोहोचले याची माहिती आता समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि तेव्हापासूनच राज कुंद्रा तपास यंत्रणांच्या रडारवर आला. अखेर 19 जुलै रोजी राज कुंद्राला अटक झाली. 


5 फेब्रुवारी रोजी मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने पॉर्न फिल्म रॅकेट उघड केले. या प्रकरणात पाच लोकांना अटक करण्यात आली. जसा जसा तपास पुढे जात गेला तसे  या प्रकरणात अटक होत गेली. या प्रकरणात एकूण नऊ लोकांना अटक करण्यात आली. एप्रिल महिन्यात पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणी चार्जशीट दाखल करण्यात आली. मात्र त्यामध्ये राज कुंद्रा यांच्या नावाचा उल्लेख केला गेला नव्हता. पॉर्न फिल्म रॅकेट उघड झाल्यावर सुद्धा राज कुंद्राला याची खात्री होती की तो अटक होणार नाही आणि म्हणूनच त्याने त्याचा प्लान बी सुद्धा तयार केला होता.


मात्र मुंबई पोलिसांसाठी हा अडचणीचा काळ होता. मुंबई पोलीस दलातील अधिकारी यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आणि मोठे फेरबदल पाहायला मिळाले. त्याच पार्श्वभूमीवर क्राईम ब्रान्चच्या प्रॉपर्टी सेलमध्ये पण नवीन अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. ज्यांनी आधी दाखल झालेल्या गुन्ह्यांचा अभ्यास करून तपास करण्यास सुरुवात केली. या मध्ये पॉर्न फिल्म रॅकेटच्या कागदपत्रांचा ही समावेश होता. त्याचा तपास नंतर नवीन नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी सुरू केला.


 राज कुंद्राच्या नावाची कुणकुण लागताच क्राईम ब्रान्च अधिकारी सतर्क झाले आणि त्यांनी महिनाभर आपला गुप्त तपास सुरू केला. ज्यामध्ये त्यांना राज कुंद्रा आणि उमेश कामत सोबतचे व्हाट्सअप चॅट हाती लागले. तर राज कुंद्राची हॉटशॉट या कंपनीचा सहभाग असल्याचीही माहिती त्यांना मिळाली. ज्यामुळे त्यांना राज कुंद्राची चौकशी आणि त्याच्या घराची झडती घ्यायची होती.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज कुंद्राला अटक करण्याआधी आठवड्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय मीटिंगही झाली होती..


19 जुलै रोजी क्राइम ब्रान्च अधिकाऱ्यांनी कोर्टात सर्च वॉरंट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तर दुसरी टीम अंधेरीमध्ये सज्ज ठेवण्यात आली होती आणि जसं सर्च वॉरंट मिळालं तस लगेच अंधेरी मधील स्टॅण्डबाय असलेल्या क्राइम ब्रान्च टीमेने विआन कंपनीत सर्च ऑपरेशन सुरू केले.थोड्या वेळातच राज कुंद्रा सुद्धा वियान ऑफिसमध्ये पोहोचला. सर्वरमध्ये क्राईम ब्रान्चला अडल्ट डेटा आणि व्हिडीयो सापडले. राज कुंद्राने क्राईम ब्रान्चला त्याचा डेटा डिलीट करण्यास सांगितलं. जे क्राईम ब्रान्चच्या एका अधिकाऱ्याने ऐकलं. मोठ्या प्रमाणात डेटा डिलीट करण्यात आला आणि म्हणून ही बाब तिथल्या क्राइम ब्रान्चच्या अधिकार्‍यांनी त्यांच्या वरिष्ठांना कळवली आणि वरिष्ठांच्या आदेशानंतर राज कुंद्रा सगळा डेटा डिलीट करू शकतो म्हणून त्याला आणि रायन थोर्पला 41A ची नोटीस देण्यात आली. रायन थोर्पने ती नोटीस स्वीकारली मात्र राज कुंद्रा ने नोटीस स्वीकारण्यास नकार दिला आणि काही तासांच्या सर्च ऑपरेशननंतर प्रॉपर्टी सेलने राज कुंद्राला प्रोपर्टी सेलच्या कार्यालयात बोलावलं. राज कुंद्राने पोलिसांसोबत त्यांच्या गाडीत जाण्यास नकार दिला आणि स्वतःच्या गाडीने प्रॉपर्टी सेलचे ऑफिसमध्ये पोहोचला. क्राईम ब्रान्चकडे पुरेसे पुरावे होते. ज्या नंतर रात्री राज कुंद्राला अटक करण्यात आली.


संबंधित बातम्या :