Raj Kundra Case : राज कुंद्राला अटक झाल्यानंतर दरम्यानच्या काळात राजला घेऊन पोलीस चौकशीसाठी त्याच्या जुहू इथल्या बंगल्यावर गेले होते. अटकेनंतर पहिल्यांदाच शिल्पा आणि राज त्यांच्या घरात आमनेसामने आले होते. त्यावेळी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शिल्पाला दोन तीनदा रडू कोसळलं. शिवाय, तिने राजला विचारलं की हे सगळं करायची गरज काय होती? या प्रकरणाचा परिणाम त्यांच्या कुटुंबियांवरही होणार आहे. इतकंच नव्हे, तर शिल्पाकडे असलेले ब्रॅंड्सही पाठ फिरवण्याची दाट शक्यता आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी की गेल्या 13 वर्षात शिल्पाने कष्टातून जी आपली व्हॅल्यू कमावली आहे तिला धोका निर्माण झाला आहे.
शिल्पा शेट्टी गेल्या 13 वर्षापासून सिनेसृष्टीत नाही. 2007 मध्ये तिने अपने सिनेमा केला. त्यानंतर ती सिनेमातून गायब झाली. अगदी अलिकडे हंगामा 2 मध्ये ती दिसली. पण त्याला 13 वर्ष जावी लागली. या काळात तिने आपली वेगळी ओळख केली. योगाचा अभ्यासकरून तिने आपली तब्येत बनवली. तंदुरुस्ती दाखवली. तिच्या फिटनेसमुळे तिच्याकडे आपोआप ब्रॅंड्स येऊ लागले. या काळात तिने छोट्या पडद्यावर रियालिटी शोमध्येही जज म्हणून भाग घेतला. एकिकडे आपलं कुटुंब आणि दुसरीकडे जमेल तेवढं काम करताना तिने फिटनेस जपला. त्यानंतर तिच्याकडे फॉलोअर्स जमू लागले. तिने आपलं द शिल्पा शेट्टी एप लॉंच केलं. त्याला 15 लाखांवर फॉलोअर्स जमले. इतकंच नव्हे, तर तिने आपलं यु ट्युब चॅनल सुरु केलं. इन्स्टावर तिचे 60 लाखांवर फॉलोअर्स आहेत. तिचं फिटनेसमधलं सातत्य पाहून तिच्याकडे ब्रॅंड येऊ लागले.
अनेकांना माहीत नसेल पण राज कुंद्राला अटक होण्याआधी तिच्याकडे तब्बल 13 ब्रॅंड्स होते. शिवाय, तिच्या पोस्ट्स ना स्पॉन्सर्स होते. रियालिटी शोमध्ये ती जज म्हणून जात होतीच. या सगळ्याचं पूरेपूर मानधन तिला मिळत होतं. हा आकडा जातो जवळपास 20 मिलियन डॉलर्सवर. म्हणजे भारतीय चलनानुसार 100 कोटी रुपयांपलिकडे. तिला मिळणारे ब्रॅड्स हे तिच्या फिटनेसमुळे आले होते. फॉलोअर्स वाढत होते. त्यामुळे तिचा या ब्रॅंड्सकडे बघायचा दृष्टिकोनही बदलला होता. एका मुलाखतीत बोलताना ती म्हणते, मी आधी जाहिराती करताना शिल्पा शेट्टी या नावाला साजेसं मानधन मिळतंय की नाही हे पाहायचे. पण इतक्या वर्षात आता माझी जबाबदारी वाढली आहे. लाखो लोक फॉलो करतायत मला. त्यामुळे ब्रॅंड घेताना मी तो योग्य आहे की नाही हे पाहाते. कारण ती माझ्यावर जबाबदारी आहे.
शिल्पा शेट्टीच्या या जबाबदारीच्या राज कुंद्रा प्रकरणामुळे ठिकऱ्या उडाल्या आहेत. म्हणूनच आता तिच्याकडे ब्रॅंड पाठ फिरवण्याची दाट शक्यता आहे. राज अटकेमुळे आणि अश्लील चित्रफित बनवणे वितरित करण्याच्या उद्योगामुळे शिल्पाच्या प्रतिष्ठेलाही धक्का लागला आहे. सोशल मीडियावर शिल्पाही ट्रोल होऊ लागली आहे. जवळपास वर्षाकाठी १०० कोटीची मिळतक एकट्या शिल्पाची असताना हे असे उद्योग करायची गरज काय होती, असं शिल्पाने राज कुंद्राला विचारणं स्वाभाविक होतं.
शिल्पाच्या हातून सध्या रियालिटी शो गेला आहे. हंगामा 2चं प्रमोशन करतानाही एरवी आमचा सिनेमा बघा असं म्हणणारी शिल्पा आता सिनेमा बघण्याची विनंती आपल्या फॉलोअर्सना करू लागली आहे. भाषेतला बदल हा राज अटकेची पहिली झलक आहे. शिल्पाभवती असलेल्या अर्थकारणावर याचा कसा परिणाम होतो, हे येत्या काही दिवसांत कळेल.