Pravin Tarde : प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित 'धर्मवीर' (Dharmaveer) हा सिनेमा दोन वर्षांपूर्वी आला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणंच बदलली. या सिनेमातून अनेक मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं होतं. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा प्रवास या सिनेमातून प्रवीण तरडे यांनी दाखवला आहे. त्यातच आता येत्या 27 सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभरात धर्मवीर-2 हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण असं असताना प्रवीण तरडे यांना आणखी एका राजकीय नेत्याच्या आयुष्यावर सिनेमा करण्याची इच्छा आहे.
प्रवीण तरडे यांनी नुकतीच सकाळ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. यावेळी प्रवीण तरडे यांनी महाराष्ट्रातल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांची नावं घेतली. त्यामध्ये शरद पवारांचं नाव घेत त्यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी पतंगराव कदम यांच्या आयुष्यावरही सिनेमा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
'त्यांचं आयुष्या एखाद्या सिनेमासारखच..'
आनंद दिघे यांच्यानंतर कोणत्या राजकीय नेत्याच्या आयुष्यावर सिनेमा तयार करायला आवडेल असा प्रश्न यावेळी प्रवीण तरडे यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, मला शरद पवारांवर सिनेमा करायला आवडेल. मी एक शेतकरी आहे, त्यामुळे आम्ही पवार साहेबांना बांधावरचा नेता म्हणतो. सतत शेतावर, बांधावर राहणारा माणूस आहे आणि त्यांचं आयुष्यही एखाद्या सिनेमासारखं आहे. बारामतीवरुन दौंडला रेल्वेतून जाऊन भाज्या विकायचे, हा जो त्यांचा प्रवास आहे तो फार रंजक आहे. तो माझ्या वाट्याला येईल की नाही माहित नाही.
पुढे त्यांनी म्हटलं की, दुसरा नेता म्हणजे पतंगराव कदम. काँग्रेसचे आमदार पतंगराव कदम यांच्या आयुष्यावरही आम्हाला सिनेमा करायला आवडेल. लोकं वेडी होतील असा सिनेमा त्यांच्या आयुष्यावर तयार होऊ शकतो.
'प्रत्येक राजकीय नेत्याची एक खास गोष्ट'
महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांविषयी बोलताना प्रवीण तरडे यांनी म्हटलं की, 'आपल्या प्रत्येक राजकीय नेत्याची एक खासियत आहे. म्हणजे शरद पवार साहेब आजही त्यांच्या कारमधून जाताना बांधावरच्या साध्या माणसालाही आवाज देतात. शिंदे साहेबांचा एक वेगळा ऑरा आहे. राज ठाकरे अगदी कसंही बोलले तरी लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे, कारण ते कलाकार आहेत. उद्धव साहेबही फार सुंदर फोटोग्राफर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय नेत्याचा हा गुण आपण राजकारणाच्याही पलिकडे जाऊन स्वीकारायला हवा. एकनाथ शिंदेना जर कुणी काम करताना पाहिलं तर शत्रूही त्यांच्या प्रेमात पडेल आणि अशी माणसं कमी असतात.'