Pravin Tarde : अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी आज पुण्यात त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Lok Sabha Election) मतदानाच्या प्रक्रियेतील चौथ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज पार पडली. यामध्ये पुणे शिरुर, जळगांव,जालना यांसह 11 मतदारसंघांचा समावेश होता. पुण्यात अनेक कलाकार मंडळींनी देखील मतदानाचा हक्क बजावल्याचं पाहायला मिळालं. अभिनेते प्रवीण तरडे यांनी देखील सपत्नीक मतदान केलं. यावेळी त्यांनी एबीपी माझासोबत संवाद साधताना प्रतिक्रिया देखील दिली.
प्रवीण तरडे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या सभेतही भाषण केलं होतं. या सभेतील त्यांचं भाषणही तुफान गाजलं. मुळशीतला प्रामाणिक मावळा आज मोदी साहेबांनी दिल्लीला पाठवण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे हात जोडून विनंती की मुळशी तालुक्याचा हा प्रामाणिकपणा आपल्याला सर्वदूर न्यायचा आहे, असं त्यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं होतं. त्यानंतर आता मतदानानंतर दिलेल्या प्रतिक्रियेनेही साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे.
पुणेकरांना माहितेय देशाला कुणाची गरज - प्रवीण तरडे
प्रवीण तरडेंनी यावेळी एबीपी माझासोबत संवाद साधताना म्हटलं की, 'जल्लोषचं वातावरण आहे. बहुतेक पुणेकरांना कळालं आहे की देशाला गरज कुणाची आहे. त्यामुळे पुणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. मतदानाला आलेल्या गर्दीनेच पुण्याचा निकाल स्पष्ट केलाय. महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपांचं राजकारण मोठ्या प्रमाणात होतोय, यावर प्रवीण तरडेंनी म्हटलं की, 'हे आरोप वैगरे याला काही अर्थ नाही, कारण पुणेकर असं काही मानतच नाहीत. ती राजकीय माणसं आहेत, तो त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे ती लोकं ते करणारच.'
पुण्यात किती टक्के मतदान
राज्यात चौथ्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. त्यात पुणे,शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातीलदेखील मतदानाची प्रक्रिया पार पडली. मात्र या मतदानाला पुणेकरांनी थंड प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. पुणे लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 44.90 टक्के मतदानाची नोंद झाली. शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 43.89 टक्के मतदानाची नोंद झाली. मावळ लोकसभा मतदार संघामध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 46.03 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सकाळच्या सुमारास पुणेकरांनी मतदानासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी पुणेकरांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. त्यानंतर दुपारीदेखी पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला.
ही बातमी वाचा :
Adinath Kothare : आदिनाथ कोठारेचा वाढदिवस, पण चाहत्यांना उत्सुकता उर्मिलाच्या पोस्टची