गेल्या काही महिन्यांपासून राधे या सिनेमाचं शुटिंग सुरू आहे. सलमान त्याच शूटमध्ये व्यस्त आहे. लॉकडाऊनमुळे या शूटला खीळ बसली आहे. पण असं असलं तरी या सिनेमातला प्रवीण तरडेचा भाग शूट करून झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रवीण आणि सलमान भेट घेत आहेत. मुळशी पॅटर्न हा सिनेमा सलमानला हिंदीत करायचा आहे. त्यासाठी प्रवीण आणि त्याची मिटिंगही झाली.
सिनेमेटोग्राफर महेश लिमये याच्या संदर्भामुळे सलमान आणि प्रवीण यांची ही भेट होऊ शकली असं बोललं जातं. या भेटीमध्ये सलमान आणि प्रवीणचं अनेक मुद्द्यांवर एकमत झालं. त्यातून सलमानने प्रवीणला य सिनेमात काम करणार का असं विचारलं. अर्थात प्रवीणनेही कोणतेही आढेवेढे न घेता होकार दिला. सलमानने दिलेला हा प्रस्ताव नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. राधे या सिनेमात प्रवीणने मराठी माणसाचीच भूमिका केली आहे.
राधेमधलं त्याचं शूट जवळपास १० दिवस चाललं. प्रवीण तरडे याने या निमित्ताने पहिल्यांदाच हिंदी व्यावसायिक चित्रपटात भूमिका केली आहे. हा अनुभव निश्चितच आनंददायी होता असं तो त्याच्या निकटवर्तीयांना सांगतो. प्रवीण सध्या हंबीरराव मोहिते यांच्यावरचा सिनेमा करण्यात गर्क आहे. लॉकडाऊनमुळे त्याच्या या सिनेमाचंही किरकोळ चित्रिकरण राहिलं आहे. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा त्याचा मानस आहे. मुळशी पॅटर्न हिंदीत येण्याबाबत मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.