प्रवीण तरडे हे नाव महाराष्ट्राला माहीत नाही असं होणार नाही. मुळशी पॅटर्न या आपल्या सिनेमामुळे ते घराघरांत पोचला. शिवाय देऊळ बंद, वेडिंगचा शिनेमा अशा अनेक सिनेमातून त्यानं काम केलं आहे. लिखाणही केलं आहे. पण मूळशी पॅटर्नच्या सिनेमातून मात्र त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. या सिनेमाचं लिखाणही त्याने केलं, दिग्दर्शनही त्याचं होतं तर त्यात त्याने कामही केलं आहे. सध्या प्रवीण सरसेनापती हंबीरराव या सिनेमाच्या कामात व्यग्र आहे. सिनेमाचं शूट 95 टक्के झालं आङे. असं असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे प्रवीणला शूट थांबवावं लागलं होतं. आता मात्र प्रवीण घरी आहे. तो त्याची पत्नी आणि मुलगा परार्ध या तिघांनीही पुण्यात आपल्या फ्लॅटमध्ये आहेत. या होम क्वारंटाईनमध्ये प्रवीणचं वेळापत्रक ऐकाल तर थक्क व्हाल. कारण त्याला जे करायचं होतं ते प्रवीण सगळं काही करतोय. खास एबीपी माझाला त्याने ही माहीती दिलीय.


याबाबत प्रवीणशी बोलताना प्रवीण म्हणाला, 'मी आजवर कधीच न अनुभवलेला हा काळ आहे. आयुष्यात मी कधीच असा घरी बसलो नव्हतो. शाळेत असताना मी नेहमी मैदानावर होतो. नंतरच्या काळात लिखाण आणि कामं येत गेली तसं अशी विश्रांती नव्हतीच. पण या निमित्ताने मी माझ्या घरच्यांसोबत पूर्ण घरी आहे. माझ्यासोबत माझी पत्नी आणि मुलगा परार्ध असे आम्ही सध्या घरी आहोत.

स्वयंपाक आणि भांडीही..
या सुट्टीत प्रवीणने सगळ्या स्वयंपाकघराचा ताबा आपल्याकडे घेतला आहे. सकाळच्या नाश्त्यापासून दुपार आणि रात्रीच्या जेवणाची जबाबदारी प्रवीणने आपल्याकडे घेतली आहे. 'अनेकांना माहीत नसेल पण मी उत्तम कुक आहे. मला जेवण बनवायला खूप आवडतं. लोक माझ्या हातचं जेवायला येतात माझ्याघरी. मी जर आपल्या इंडस्ट्रीत आलो नसतो तर उत्तम शेफ झालो असतो असं म्हटलंतर तरी वावगं नाही. तर मस्त जेवण करणे. त्यानंतर सगळी भांडी धुण्याची जबाबदारीही माझीच असते. त्यामुळे स्वयंपाक करायचा आणि नंतर भांडी धुवायची हा सध्या माझा रोजचा उपक्रम आहे. मस्त मस्त जेवण बनवायचं आणि खाऊ घालायचं. त्यात सध्या मी चपाती करायला शिकतोय. मला चपाची आणि भाकरी येत नाही. ती मी शिकतोय आणि या पुढच्या 21 दिवसांत मी उत्तम भाकरी करायला शिकणार यात शंका नाही.'

तुम्हाला कोण हवंय? माणसं की गाढवं?

थोडं कामही महत्वाचं
मस्त नाश्ता, जेवण आणि भांडी झाल्यानंतर तरडेंची गाडी वळते ती कामाकडे. म्हणजे सरसेनापती हंबीररावचं 95 टक्के शूट पूर्ण झालं आहे. सध्या त्याच्या संकलनाचं काम सुरू आहे. पुढचे किमान पाच तास प्रवीण या सिनेमाचं घरीच एडिटिंग करतो. याचीही माहीती त्याने माझाला दिली. 'सरसेनापती हंबीरराव हा मोठा सिनेमा आहे. लोकांचे पैसे त्यावर लागले आहेत. त्याचं कमाही मला करायचं आहे. कारण हे कोरोनाचं सावट गेलं की पहिल्यांदा मला सिनेमा रिलीज करायचा आहे. माझ्या घरी एडिटचा सगळा सेटअप आहे. जेवणं, भांडी झाली की मी सलग पाच तास एडिट करतो. एकिकडे ते कामही आहेच ना.'

व्यायाम 108 नमस्कारांचा
सरसेनापती.. या सिनेमाचं पोस्टर आलं तेव्हाच हंबीररावांच्या भूमिकेत प्रवीण तरडे उठून दिसत होता. त्यासाठी त्याने तब्येतही केली आङे. हा व्यायामाचा वसा त्याने जीम बंद झाली तरी सोडलेला नाही. तो आजही घरच्याघरी 108 सूर्य नमस्कार घालतो. थोडे सीटअम्स, पुशअप्सही मारण्याकडे त्याचा कल आहे. अर्थात त्याला हे करावं लागेलच कारण सिनेमाचं शूट अजून पूर्ण संपलेलं नाही.

जेव्हा प्रवीण भिकारी होतो..
हा मथळा वाचून दचकलात ना.. पण प्रवीणला मात्र यात भरघोस आनंद मिळतो. मुलगा परार्धसोबत प्रवीण पत्त्यांचा डाव मांडतो. त्यातही भिकार-सावकार त्याच्या मुलाचा आवडीचा खेळ. मग प्रवीण आणि परार्धची ही जोडी जमते. खेळ रंगात येतो आणि दरवेळी सावकार होतो परार्ध. 'आमच्याकडे सध्या भिकार-सावकार हा डाव फुल डिमांडवर आहे. आम्ही सतत तो खेळतो आणि तो मला हारवतो. मुलाकडून हारण्यातली मजा काही और आहे. त्यालाही मस्त वाटतं. पण वेळ मिळतोय तर त्याच्यासोबत खेळायला मजा येते,' असं प्रवीण हसत हसत सांगतो.

वाचन आणि वेबसीरीज पाहाणं
त्यानंतर मात्र त्याचा मोर्चा वळतो वेबसिरीजकडे. 'मला बऱ्याच दिवसांनी इतका वेळ मिळाला आहे. त्यामुळे मी रात्रीचा वेळ वेबसीरीज बघण्यातही घालवतो. अगदी घेतली की सगळी संपवली असं होत नाही. पण शक्य तो पाहोतो. आणि त्यानंतर झोपेच्या आधी एक तास वााचन. सध्या मी रंगनाथ पाठारेंचं सातपाटील कुलवृतांत वाचतोय.' हे सगळं सुरू असताना अधेमधे झाडांना पाणी घालणं. मित्रांशी अर्धातास फोनवर आवर्जून बोलणं हेही त्याचं चालू आहेच.

लिखाण बंद
या काळात प्रवीणने फाटा दिला आहे तो मात्र लिखाणाला. मी सतत लिखाण करत असतो. सतत वर्षभर ते सुरूच असतं. आता या सुट्टीत मी त्याला जरा विश्राम दिला आहे. बाकी सगळ्या गोष्टी करून पाहायच्या आहेत. खूप नव्या गोष्टी शिकायच्या आहेत. मला आईसारखी भाकरी शिकायची आहे. माझी आई मुळशीला असते. मी कोथरूडला. त्यामुळे रोजची भेट होत नाही. अशावेळी आईसारखी भाकरी करता यायला हवी असंही मला वाटतं, असं ही प्रवाीणने माझाशी बोलताना आवर्जून नमूद केलं.

Coronavirus | देशातील सर्व भाजप खासदार प्रत्येकी एक कोटी देणार