Prathamesh Parab Wedding : काही दिवसांपासून अभिनेता आणि प्रेक्षकांचा लाडका दगडू म्हणजेच प्रथमेश परब (Prathamesh Parab) हा आज म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. त्याआधी त्याची होणारी पत्नी आणि गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर (Kshitija Ghosalkar) हीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. क्षितीजाने तिच्या घरासाठी ही पोस्ट लिहिलीये. त्यावर प्रथमेशने केलेल्या कमेंटने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. प्रथमेशच्या हळदीचे, क्षितीजाच्या मेहंदीचे फोटो सध्या बरचे चर्चेत आहेत. तसेच त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनी देखील बऱ्याच कमेंट्स करत त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या होत्या.
प्रथमेशने 14 फेब्रुवारी रोजी क्षितीजासोबत साखरपुडा केला होता. तसेच त्यानंतर त्यांच्या प्रीवेंडीच्या फोटोंवर देखील चाहत्यांनी खूप प्रेम केलं. नुकतच क्षितीजाने भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टवर प्रथमेशने केलेल्या कमेंटने चाहत्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. क्षितीजाने तिच्या माहेरसाठी पोस्ट करत तुझी आठवण कायम येत राहील अशा आशयाची पोस्ट केली होती. त्यावर प्रथमेशने कमेंट करत तुला एवढं प्रेम देऊ की तुला दोन्ही घरं आपली वाटली पाहिजेत, अशी कमेंट केली आहे.
क्षितीजाने पोस्टमध्ये काय म्हटलं?
क्षितीजाने तिच्या आताच्या घरासाठी म्हणजे तिच्या माहेरसाठी ही पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये तिने म्हटलं की, आज सजलेल्या मंडपाने किती छान दिसतंय माझं घर. आजपर्यंत , तुझी "माझं घर", अशी असलेली ओळख आता "माझं माहेर", अशी होणार आणि आता अवघ्या काही तासांतच मी तुझा निरोप घेणार. तुझ्या प्रत्येक कोपऱ्याशी असलेल्या आठवणींना आज जणू खास एक चेहराच मिळालाय. काही मनसोक्त हसतायत, काही अलवार रडतायत, काहींमध्ये मला माझं बालपण दिसतंय, तर काहींमध्ये मी सासरी जाणार म्हणून होणारी घालमेल!!! त्या सगळ्यांना मी माझ्या हृदयाच्या कुपीत कायम जपून ठेवणार! सणावाराला येईन आवर्जून, तुझी भेट घ्यायला, तुही मग तयार रहा,आपलं नेहमीचं हितगुज करायला, सासरी रमेपर्यंत आणि रमल्यानंतरही तुझी आठवण मात्र कायम येईल.
प्रथमेशच्या कमेंटने वेधलं लक्ष
क्षितीजाच्या या पोस्टवर प्रथमेशच्या कमेंटने विशेष लक्ष वेधलं आहे. प्रथमेशने कमेंट करत म्हटलं की, किती छान ..तुला इकडे एवढं प्रेम देऊ की तुला दोन्ही घर आपली वाटतील. सध्या या दोघांच्या घरी लग्नाची धामधुम सुरु आहे. तसेच आजच हे जोडपं लग्नबंधनात अडकून त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.