Prasad oak : अभिनेता प्रसाद ओक (Prasad oak) हा झी मराठीवरील 'अवघाची संसार' या मालिकेतील खलनायकाच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्याच्या या भूमिकेचं आजही तितकंच कौतुक केलं जातं. झी मराठी वाहिनीवरील अवघाची संसार ही मालिका तुफान गाजली होती. या मालिकेची गोष्टही प्रेक्षकांना मनापासून भावली. या मालिकेतील प्रसादच्या नकारात्मक भूमिकेचं निळू फुलेंनी कौतुक केलं होतं. 


प्रसादने नुकतीच व्हायफळ या पॉडकास्टला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये प्रसादने हा किस्सा सांगितला आहे. निळू फुले यांच्याही नकारात्मक भूमिका या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणाऱ्या आहेत. किंबहुना प्रेक्षक आजही त्यांच्या नकारात्मक भूमिकेवरच भरभरुन प्रेम करतात. याच निळू भाऊंनी प्रसादच्या नकारात्मक भूमिकेचं जेव्हा कौतुक केलं, तेव्हा मला ऑस्कर मिळाला असं वाटलं अशी भावना अभिनेत्याने व्यक्त केली आहे. 


निळू फुलेंनी पाहिली प्रसादची मालिका


निळू फुलेंचा हा किस्सा सांगताना प्रसादने म्हटलं की, 'अवघाची संसार मालिकेत मी नकारात्मक भूमिका केली होती. ती मालिका आणि माझी ती भूमिकाही प्रचंड गाजली होती. भाऊंच्या एका सिनेमाचं शुटींग होतं 15 दिवस आणि अचानक ते कॅन्सल झालं. गार्गीच्या आई ती मालिका बघायच्या. त्यांनी तेव्हा टिव्ही लावला आणि तेव्हा भाऊंनी पाहिलं. त्यांनी विचारलं की, कोण गं प्रसाद आहे का? त्या म्हणाल्या होत प्रसाद आहे. अरे व्वा! मग बसतो बघायला असं म्हणत त्यांनी एक एपिसोड पाहिला. त्यानंतर रोज 15 दिवस ते एपिसोड पाहत होते.'


पुढे प्रसादने म्हटलं की, सोळाव्या दिवशी त्यांनी मला फोन केला. मला म्हणाले की, 'प्रसाद तुझी ती मालिका सुरु आहे, त्याचे 10 ते 15 भाग मी पाहिले. मला फार कौतुक वाटलं तुझं. मीही बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने विलन केला आहे. पण टेलिव्हिजनवर मी कधी विलन केला नाही. मी तुझा विलन पाहिला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, रोजच्या रोज एपिसोडमध्ये त्याच इंटेसिटीने विलन ही फार अवघड गोष्ट आहे आणि ती तू फार उत्तमरित्या करत आहेस. मला असं वाटतं की, मला त्याच वेळेला ऑस्कर मिळाला. ज्या माणासाला मी देव मानतो, माझा गुरु मानतो त्या माणसाने माझं सलग 15 दिवस काम पाहणं आणि त्याने मला हे फोन करुन सांगणं ही किती मोठी गोष्ट आहे.' 


ही बातमी वाचा : 


Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection Day 7: 'भूल भुलैया 3'नं 'सिंघम अगेन'ला बॉक्स ऑफिसवर पाजलं पाणी; आता 200 कोटींपासून फक्त काही पावलं दूर