Prasad oak : अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) हा लवकरच 'धर्मवीर-2' (Dharmaveer 2) या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याने साकारलेली आनंद दिघे (Anand Dighe) यांची भूमिका ही विशेष पसंतीस उतरली. त्या भूमिकेचं राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनीही बरंच कौतुक केलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रसादला प्रेक्षक आनंद दिघेंच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
सध्या मराठी सिनेसृष्टीत प्रसाद ओक हे आघाडीच्या अभिनेते आणि दिग्दर्शकांमध्ये मोडणारं नाव आहे. त्यामुळे सध्या तो मराठी सिनेसृष्टीमधला सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता असल्याचं म्हटलं जातंय. यावर स्वत: प्रसादने खुलासा केला आहे. आरपार ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे.
प्रसादने काय म्हटलं?
तू मराठी सिनेसृष्टीतला तू सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहेस? यावर उत्तर देताना प्रसादने म्हटलं की, 'हा प्रश्न तुम्ही दोन व्यक्तींना विचारायला हवा. एक म्हणजे मंजिरी ओक कारण ती माझे सगळे व्यवहार सांभाळते आणि दुसरी व्यक्ती मंगेश देसाई, ज्याने या सिनेमाची निर्मिती केली आहे. पण या प्रश्नाचं उत्तर देताना मला सांगायला आवडेल की, मी Highest Paid आहे का? मी Highest Viewed आहे का? यामध्ये मला सगळ्यात जास्त रस आहे. माझ्याबाबत जास्तीत जास्त वाचलं जातंय का? मी सगळ्यात जास्त वेड लावणारा अभिनेता आहे का? या गोष्टींमध्ये मला जास्त रस आहे. त्यामुळे मी सगळ्यात जास्त मानधन घेणारा आहे, हा काही फार महत्त्वाचा मुद्दा नाही.'
'तेव्हा भूक मारण्याकरता...'
घरात पेट असणं किंवा ब्लॅक कॉफी पिणं हे तुम्ही जेव्हा श्रीमंत या कॅटेगरीमध्ये जाता तेव्हा ते तुमचे स्टेटस सिंबल होतात असं तुला वाटतं का? यावर प्रसादने दिलेल्या उत्तराने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रसादने म्हटलं की, 'जेव्हा भूक भागावायला लागतात तेवढे पैसे नव्हते आणि भूक भागवण्यासाठी लागणारं अन्न मिळवता येत नव्हतं, तेव्हा ती भूक मारण्याकरता ब्लॅक कॉफी प्यायला लागलोय. कॉफीने भूक मरते.'