Prasad Oak : अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) हा 'धर्मवीर' (Dharmaveer) या सिनेमामुळे बराच चर्चेत आला. या सिनेमात त्याने शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचं राजकीय वर्तुळातही बरंच कौतुक झालं होतं. त्यानंतर आता तो लवकरच धर्मवीर-2 या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दरम्यान प्रसाद त्याच्या कामासह वैयक्तिक आयुष्यामुळेही बराच चर्चेत राहिला होतं. 


अभिनेता प्रसाद ओक याने मागच्या वर्षी मुंबईत त्याच्या हक्काचं घर घेतलं. त्याने त्याच्या लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्ताने त्याची पत्नी मंजिरी हिला ते घर गिफ्ट केलं. पण त्यावेळी प्रसादला अनेकांनी त्याच्या घरावरुन ट्रोलही केलं होतं. त्यावर आता प्रसाद ओकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भाष्य केलंय. हे घर स्वत:च्या कष्टातून उभारलं असून कुणीही दिलं नसल्याचंही प्रसादने यावेळी म्हटलं आहे. 


'आज मागे वळून पाहताना...'


प्रसादने लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की, 'आज मागे वळून पाहताना समाधान वाटतं,आनंद वाटतो, तृप्ती वाटते. गंम्मत अशी आहे की, लग्न करुन जेव्हा मी पहिल्यांदा मंजूला घेऊन मुंबईत आलो तेव्हा दादारला उतरलो. त्यावेळी तिने मला विचारलं की,आता कुठे जायचं अंधेरीला का? तेव्हापासून तिला जुहूचं, लोखंडवालाचं फॅसिनेशन होतं. तेव्हा मी तिला म्हटलं की, आपण बोरीवलीला जातोय. तेव्हापासून तिला वाटायचं की, आपण अंधेरीत घर कधी घेणार?'  


पुढे त्याने म्हटलं की, 'तेव्हापासूनच मुलांचं शिक्षण सांभाळत, थोडे थोडे पैसे बाजूला काढून ठेवत होतो. त्यानंतर मागच्या वर्षी घर घेतलं आणि मागच्या वर्षी घर घेतल्याचं कारण म्हणजे आमच्या लग्नाला त्या वर्षी 25 वर्ष पूर्ण झालीत. त्यामुळे असं वाटलं, या वर्षी हे गिफ्ट देणार नाही तर कधी देणार. पण गंम्मत अशी की, ते तिचं स्वप्न होती की, तिला हवं तसं घर मिळणं, हव्या त्या भागात मिळणं हे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. डॉक्टर लागूंचे, निळूभाऊंचे आहेत, राजा गोसावी, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या सगळ्यांच्या आशीर्वादाची पुण्याई आहे. पण लोकांना असं वाटतं की, याला असंच मिळालं आहे घर, पण ते असंच मिळालं नाहीये,  रक्ताचं पाणी करुन, खस्ता खाऊन झालेलं आहे घर. ते असंच मिळालं नाहीये किंवा शासकीय कोट्यातूनही मिळालेलं नाहीये.  असा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. ते स्वत:च्या हक्काचं, कुणाचं लांगुनचालन न करता मिळालेलं घर आहे.'


'अशी' आहे प्रसाद-मंजिरीची लव्हस्टोरी (Prasad Oak Lovestory)


प्रसाद ओक आणि मंजिरी ओकची पहिली भेटच एका अभिनय शिबिरामध्ये झाली होती. हे शिबिर प्रसादनेच आयोजित केलं होतं. तीन महिन्यांच्या या शिबिरादरम्यान प्रसाद-मंजिरीची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला. मराठी मनोरंजनसृष्टीतील पॉवर कपल म्हणून ते ओळखले जातात.