Prasad Oak :  सध्याच्या काळात अनेकजण सोशल मीडियाचा वापर करतात. रीलच्या माध्यमातून अनेकजण अभिनय करतात.इन्फ्लुएन्सर्सचे व्हिडीओ कंटेट, अॅक्टिंगमुळे अनेकांच्या पसंतीस उतरतात. त्यामुळे  सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्स सध्याच्या काळात सेलिब्रिटी झाले  आहेत. यामुळे आता सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्स आता चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकतात. सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सला अशाप्रकारने काम देण्यास अनेक कलाकारांनी विरोध केला आहे. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकने (Prasad Oak) यावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.  अशा ट्रेंडला ठेचून काढले पाहिजे असे वक्तव्य प्रसाद ओकने केले आहे.


अभिनेता प्रसाद ओकने ‘कॉकटेल स्टुडिओ’ ‘या युट्युब चॅनेलला मुलाखत देताना वेगवेगळ्या प्रश्नांना बेधडक वक्तव्य केले आहे. फॉलोअर्सच्या संख्येवर इन्फ्लुएन्सर्सला काम दिले जाते. यावर प्रसाद ओकने नाराजी व्यक्त केली. प्रसाद ओकने म्हटले की,  हे अतिशय दुर्देवी आहे. अत्यंत थर्ड क्लास क्राइटेरिया आहे हा की ज्यांचे फॉलोअर्स जास्त तो चांगला किंवा मोठा अ‍ॅक्टर्स आहे. हा हिंदीवाल्यांनी आणलेला ट्रेंड आहे; जो मराठीत रुजू पाहतोय. पण तो वेळीच ठेचला गेला पाहिजे आणि तो ठेचला जाईलच, असा विश्वास प्रसाद ओकने व्यक्त केला. 


फॉलोअर्सच्या कॅटगिरीचा मराठीत फरक पडणार नाही


प्रसाद ओकने म्हटले की, मराठी सिनेसृष्टीत परेश मोकाशी, आदित्य सरपोतदार, प्रविण तरडे, रवी जाधव, विजू माने आणि मी स्वत: असे आम्ही अनेक सहकारी, दिग्दर्शक जे परफॉर्मन्सवर विश्वास ठेवणारे आहोत. तोपर्यंत फॉलोअर्सच्या कॅटेगिरीचा मराठी सिनेसृष्टीत कोणताही परिणाम होणार नाही किंवा मोठा फरक पडेल असे मला वाटत नसल्याचेही प्रसाद ओकने म्हटले.  हिंदीत हा प्रकार सुरू आहे. पण एकदा त्यांना तो कलाकार कसा आहे हे कळल्यावर त्याला ते अनफॉलो करतील असेही त्याने म्हटले. 






प्रसाद ओकचे आगामी चित्रपट 


 






प्रसाद ओक आता धर्मवीर-2, महापरिनिर्वाण, गुलकंद, पठ्ठे बापूराव, वडापाव आदी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.