Prajaktta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. आज गुरुपौर्णिमेनिमित्त प्राजक्तानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्तानं चाहत्यांना तिच्या तीन आध्यात्मिक गुरुंची माहिती दिली आहे. पोस्टमध्ये प्राजक्तानं काही फोटो शेअर करुन त्याला खास कॅप्शन देखील दिलं आहे. 


प्राजक्ताची पोस्ट
प्राजक्तानं श्री श्री रविशंकर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच ओशो आणि बुद्ध यांचे विचार देखील या पोस्टमध्ये प्राजक्तानं मांडले आहेत. प्राजक्तानं पोस्टमध्ये लिहिलं, 'माझे तीन आध्यात्मिक गुरु. श्री श्री रविशंकर यांनी मला सुदर्शन क्रिया आणि ध्यान करण्याची क्रिया सांगितली. ओशो यांनी मला 'ना भोगो ना त्यागो वरन जागो.' हा परम मंत्र सांगितला. तर बुद्धांनी मला जीवनाचे तत्वज्ञान, त्यांनी माझ्या मनाला आणि हृदयाला ट्रेनिंग दिले. त्यांनी मला जीवन जगण्याचा उद्देश दिला. '


पुढे प्राजक्तानं पोस्टमध्ये लिहिलं, ' कधी कधी आपलं जीवनाचं तत्वज्ञान सांगायला भिती वाटते.  ते जाहीर केल्यावर तंतोतंत पाळायची जबाबदारी येते आणि कधी कधी ते बदलतं देखील.  पण माझा आत्ता ह्या क्षणी ह्यांच्यावर विश्वास आहे हे सांगायला हवं, अस मला वाटतं. आणि मी माणूस आहे. पुढे जाऊन मी चुकेन, हरवेन; पण एका माणसामुळे तुम्ही तुम्हांला पटलेल्या “ज्ञानावरचा” विश्वास गमावू नका. ज्ञानावर संशय घेऊ नका. असो , भारतीय गुरू परंपरेतील सर्व गुरूंना, आई- वडील, माझ्या नृत्य आणि योग गुरूंना, शालेय- कॅालेज शिक्षकांना तसेच माझ्या नकळत ज्यांनी ज्यांनी मला घडवलं त्यांना माझा हा virtually साष्टांग दंडवत.' 






प्राजक्ता सध्या तिच्या रानबाझार या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये प्राजक्तानं रत्ना ही भूमिका साकारली आहे. रानबाझार सीरिजमधील प्राजक्ताच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येते. तसेच काही महिन्यांपूर्वी लकडाऊन हा प्राजक्ताचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. प्राजक्ताबरोबरच या चित्रपटामध्ये अभिनेता अंकुश चौधरीनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती.  जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली. 


हेही वाचा:


Prajakta Mali : '108 सूर्यनमस्कार'; फिटनेस फ्रीक प्राजक्ताचा व्हिडीओ व्हायरल