Prajakta Mali : मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. प्राजक्ता तिच्या फिटनेसकडे देखील विशेष लक्ष देते. प्राजक्ता वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ शेअर करुन तिच्या चाहत्यांना फिटनेसच्या टिप्स देते. नुकताच एक खास व्हिडीओ प्राजक्तानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता ही 108 सूर्यनमस्कार घालताना दिसत आहे.
प्राजक्तानं हा सूर्यनमस्कार घालतानाचा व्हिडीओ शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, '108 सूर्यनमस्कार, जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने, आज केले. योगा दिन 21 ला असतो. कदाचित 21 ला परत करेन, तुम्ही पण माझ्याबरोबर करणार असाल तर ...काय म्हणता, करणार का? जमेल तितके करा…सूर्यनमस्कार घालण्याच्या अनेक पद्धती आहेत… हा मैसूर style हट सूर्यनमस्कार आहे. ' हा व्हिडीओ शेअर करुन प्राजक्तानं तिच्या चाहत्यांना यंदाच्या 'योगा- डे'ला सूर्यनमस्कार घालण्याचा संदेश दिला आहे.
पाहा प्राजक्ताचा व्हिडीओ
प्राजक्ता सध्या तिच्या रानबाझार या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये प्राजक्तानं रत्ना ही भूमिका साकारली आहे. रानबाझार सीरिजमधील प्राजक्ताच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येते. तसेच काही महिन्यांपूर्वी लकडाऊन हा प्राजक्ताचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. प्राजक्ताबरोबरच या चित्रपटामध्ये अभिनेता अंकुश चौधरीनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली.
योगाचे फायदे
योगा केल्यानं रागावर नियंत्रण ठेवता येते. तसेच पचन क्रिया देखील योगा केल्यानं चांगली होते. योगा केल्यानं तणाव थकवा दूर होऊन शरीर निरोगी राहते. सूर्यनमस्कारासोबतच बालासन,मत्स्यासन,जानुशिरासन यांसारखे आसन तुम्ही करु शकता.
योगा-डे ची यंदाची थिम
मन की बात या कार्यक्रमाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगा-डेची यंदाची थिम सांगितली. ते म्हणाले, "21 जून रोजी आपण 8वा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करणार आहोत. या 'योग दिवसाची संकल्पना (Theme) आहे - “मानवतेसाठी योग”. मी तुम्हा सर्वांना 'योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करतो. तुम्हीही 'योग दिना'ची तयारी आत्तापासूनच सुरू करावी असे मला वाटते. अधिकाधिक लोकांना भेटा, सर्वांना 'योग दिना'च्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करा, प्रेरणा द्या."
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
हेही वाचा :