Kaljayi Savarkar : विवेक समुहाची निर्मिती असलेल्या 'दुर्दम्य लोकमान्य' या लोकमान्य टिळकांच्या आयुष्याचे पदर नव्याने उलगडून सांगणाऱ्या माहितीपटाची मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नुकतीच विशेष स्क्रिनिंगसाठी निवड करण्यात आली आहे. येत्या 31 मे रोजी दुपारी 2 वाजता या माहितीपटाचे स्क्रिनिंग पेडर रोडवरील फिल्म डिव्हिजन येथे होणार आहे. याच पार्श्वभूमीवर 'विवेक समूह' आणखी एका लघुपटाची निर्मिती करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
या नव्याने येऊ घातलेल्या लघुपटाचीही आता चांगलीच चर्चा ऐकिवात आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा झालेली नसली तरी हा लघुपट 'स्वातंत्र्यवीर सावरकरां’च्या आयुष्यावर बेतलेला असेल असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 'कालजयी सावरकर' (Kaljayi Savarkar) असे या नव्या लघुपटाचे नाव असून, नुकतेच त्याचे पहिले पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्याचे विविध पैलू आणि अंतरंग उलगडणार!
या लघुपटातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्याचे विविध पैलू आणि अंतरंग उलगडून दाखवण्यात येणार आहेत. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे गेली अनेक वर्षे जाहिरात क्षेत्रातील एक प्रथितयश नाव म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा गोपी कुकडे यांनी लघुपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या निमित्ताने ते प्रेक्षकांसमोर काहीतरी अनोखं घेऊन येण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत.
लघुपटाचे लेखन अभिनेत्री आणि लेखिका समीरा गुजर आणि अमोघ पोंक्षे यांनी केले असून, अक्षय जोग यांनी संशोधनासाठी लागणारे सहाय्य केले आहे. या लघुपटात नक्की कुठले कलाकार असणार आहेत आणि ते कुठली भूमिका साकारणार आहेत, याबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर या लघुपटात सावरकरांची मुख्य भूमिका कोण साकारणार याविषयी विलक्षण उत्सुकता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्याचे चित्रण करण्यापलीकडे हा लघुपट त्यांच्या कालातीत विचारांना केंद्रस्थानी ठेऊन त्यावर भाष्य करताना दिसेल असे लघुपटाच्या नावावरून लक्षात येत आहे.
हेही वाचा :
Swatantra Veer Savarkar : रणदीप हुडाचा ‘वीर सावरकर’ चित्रपटातील पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला!