Hero Alom : बांग्लादेशचा सोशल मीडिया स्टार हिरो अलोमबद्दल (Hero Alom) अनेकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळते. एकेकाळी दोनवेळच्या अन्नाची भ्रांत असणारा हा व्यक्ती आजघडीला बांग्लादेशातील सुपरस्टार झाला आहे. मात्र, आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. हिरो अलोमला ताब्यात घेण्याचं कारण देखील समोर आलं आहे. केवळ बेसूर गाणी गातो म्हणून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यानंतर तब्बल आठ तास त्याची  चौकशी करण्यात आली.


यावेळी ‘तू अतिशय बेसूर आवाजात गाणी गातोस, यापुढे गाणी गाऊ नकोस’, असे पोलिसांनी त्याला बजावले आहे. तर, या चौकशी दरम्यान पोलिसांनी आपला मानसिक छळ केल्याचा आरोप अलोमने केला आहे.


हिरो अलोमचा मोठा चाहतावर्ग!


स्वत:ला गायक, अभिनेता आणि मॉडेल म्हणवणाऱ्या अलोमचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. फेसबुकवर अलोमला तब्बल 20 लाख लोक फॉलो करतात. तसेच, यूट्यूबवर त्याचे 14 लाखांहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. तो चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करत असतो. मात्र, त्याच्या या गाण्यांमुळेच त्याला अडचणींचा सामना करावा लागला आहे. पोलिसांनी त्याला गाणे न गाण्यासाठी ताकीद दिली आहे.



नेमकं प्रकरण काय?


स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यात काही लोकांनी अलोमबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत शास्त्रीय गाण्यांशी छेडछाड केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. त्याचा आवाज बेसूर असून, त्याने एका शास्त्रीय गाण्याच्या शब्दांशी छेडछाड केल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. या तक्रारींनंतर पोलिसांनी अलोमला ताब्यात घेतले. या दरम्यान, पोलिसांनी अलोमकडून एका माफीनाम्यावर स्वाक्षरी करून घेतल्याचेही बोलले जात आहे.


अलोमने माध्यमांना दिली माहिती


बांग्लादेशात सध्या हे प्रकरण चर्चेत आले आहे. बांग्लादेशात देखील अलोमची मोठी फॅन फॉलोईंग आहे. या प्रकरणानंतर त्याच्या काही चाहत्यांनी संतापही व्यक्त केला होता. सदर प्रकरणाची माहिती हिरो अलोमने माध्यमांना दिली. अलोम म्हणाला की, गेल्या आठवड्यात पोलिसांनी सदर प्रकरणी त्याला ताब्यात घेतले होते. यावेळी पोलिसांनी त्याचा मानसिक छळ केला. यासोबतच त्याला पुन्हा शास्त्रीय गाणी गाण्यासही मनाई करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला तब्बल 8 तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते. यादरम्यान त्याला माफीनाम्यावर स्वाक्षरीही करायला लावली.


पोलिसांच्या माहितीनुसार, अलोमने शास्त्रीय गाणे चुकीच्या पद्धतीने गायल्याबद्दल आणि आपल्या व्हिडीओंमध्ये पोलिसांचा गणवेश परिधान केल्याबद्दल माफी मागितली आहे. मात्र, अलोमने माध्यमांना दिलेल्या माहितीनंतर आता नेटकरी बांग्लादेशच्या पोलिसांवर टीका करत आहेत.


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 6 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!


Happy Birthday Aditya Narayan : लहान वयातच गायली 100हून अधिक गाणी, अभिनयातही आजमावलं नशीब! वाचा आदित्य नारायणबद्दल..