Sangli Crime : सांगलीत (Sangli) सहा तलवारी (Sword), कोयता (Sickle) असा घातक शस्त्रसाठा बाळगून त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. रोहित कुसाळकर असे या संशयित व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून सहा तलवारी आणि एक कोयता जप्त केला करण्यात आला आहे.
  
सांगलीतील नवीन वसाहत रोडवर ही कारवाई करण्यात आली.  पोलिसांनी या तरुणाकडून सहा तलवारी आणि एक कोयता असा एकूण 6 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.


अवैध हत्यारे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. 5 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक  जिल्ह्यामध्ये शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी बिरोबा नरळे यांना माहिती मिळाली की, रोहित कुसाळकर हा लोखंडी तलवारी आणि कोयता घेऊन गोकुळनगर परिसरात फिरत आहे. यानंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचून रोहित कुसाळकरला पकडलं. त्याची कसून तपासणी केली असता त्याच्याजवळ एक पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची गोणी मिळाली. या गोणीमध्ये काय आहे असे विचारले असता त्याने तलवारी आणि कोयता असल्याचे सांगितले. 


संबंधित हत्यारे त्याने कुठून आणि कशासाठी आणली याबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की, मी माझ्या मित्राकडून या तलवारी बनवून विक्रीसाठी आणल्या आहेत. त्यावेळी त्याच्याजवळील तलवारी आणि कोयता असा एकूण 6 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे इथे सुपूर्द करण्यात आला आहे. 


ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार, उपनिरीक्षक विशाल येळेकर, बिरोबा नरळे, विक्रम खोत, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, संदीप पाटील यांच्या पथकाने केली.