मुंबई: शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'पठाण' (Pathaan) या चित्रपटावरुन सुरू झालेला वाद अद्याप थांबण्याचं लक्षण नाही. या चित्रपटातील 'बेशरम रंग' (Beshram Rang) हे गाणं हटवावं अशी मागणी करत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही धाव घेण्यात आली आहे. त्यात हिंदुत्ववादी संघटनांकडून या चित्रपटाला आणि शाहरुख खानला रोज वेगवेगळे इशारे मिळत आहेत. आता त्यात अयोध्याच्या परमहंस आचार्य ( Paramhans Acharya) यांचा समावेश झाला आहे. त्यांनी तर शाहरुख खानला थेट जीवे मारण्याची धमकीच दिली आहे. 


Paramhans Acharya on Shahrukh Khan: अयोध्याच्या आचार्यांची शाहरुखला धमकी 


अयोध्याचे परमहंस आचार्य यांनी शाहरुखच्या पठाण या चित्रपटाला विरोध केला आहे. शाहरुखने भगव्या रंगाचा अपमान केला असून त्यामागे हिंदुंच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप त्यांनी केला. चित्रपट म्हणजे पैसा कमावण्याचा धंदा बनला असून त्यामागून अनेक छुपे काळे धंदे केले जात असल्याचंही ते म्हणाले. 


परमहंस आचार्य यांच्या नेतृत्वाखाली आज अयोध्यामध्ये काही संघटनांच्या वतीनं शाहरुख खानच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. ज्या दिवशी शाहरुख खान मिळेल त्या दिवशी त्याची चमडी काढेण, त्याला जिवंत जाळेन असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं. 


एवढ्यावरच आचार्य थांबले नाहीत तर ते यापुढे जाऊन म्हणाले की, माझे लोक मुंबईमध्ये असून ते शाहरुख खानला शोधत आहेत. त्याला जो कोणी मारेल त्याच्या परिवाराला आर्थिक मदत करणार आणि त्याचा खटलाही लढवणार असल्याचं आचार्य परमहंस यांना वादग्रस्त वक्तव्य केलं. 


Besharam Rang: भगव्या बिकिनीवरुन वाद 


 
पठाण सिनेमाचं पहिलं गाणं 'बेशरम रंग'  12 डिसेंबर रोजी रिलीज झालं होतं. या गाण्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Dipika Padukone) आणि शाहरुख खानची केमिस्ट्री दाखविण्यात आली आहे. शेअर केलेल्या या व्हिडीओमधील गाण्यात दीपिकाचा ग्लॅमरस आणि बोल्ड लूक दिसत आहे. 'बेशरम रंग' या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने घातलेल्या बिकीनीच्या भगव्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला.


शाहरुख आणि दीपिकाचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे.